खेळाडू नोंदणीसाठी पुरेसा कालावधी द्यावा
अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील शालेय क्रीडा स्पर्धा दरवर्षी जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नियोजन प्रक्रियेनुसार आयोजित केल्या जातात. मात्र यंदा ऑगस्ट महिना सुरू होऊनही खेळाडू नोंदणी, स्पर्धांचे वेळापत्रक आणि आयोजनाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने माध्यमिक शाळांतील क्रीडा शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी (डीएसओ) यांच्या पोर्टलद्वारे खेळाडूंची नोंदणी आणि स्पर्धांचे नियोजन केले जात होते. यंदा ही प्रक्रिया स्पोर्टस महाराष्ट्र विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र संबंधित संकेतस्थळ अद्याप कार्यान्वित नसल्यामुळे नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही.
नवीन प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थी खेळाडूसाठी पहिलीच्या जनरल रजिस्टरची प्रत, जन्मदाखला आणि आधार कार्ड ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी खेळाडू असल्याने एवढ्या कमी कालावधीत सर्व कागदपत्रे संकलित करून स्कॅन करणे व ऑनलाइन अपलोड करणे हे अत्यंत जिकिरीचे आणि अशक्यप्राय काम ठरणार आहे.
स्पर्धांचे वेळापत्रक अचानक जाहीर झाल्यास शिक्षकांवर अतिरिक्त प्रशासकीय ताण येईल, तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने संकेतस्थळ सुरू करून खेळाडू नोंदणीसाठी पुरेसा कालावधी द्यावा, तसेच जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे वेळापत्रक आगाऊ जाहीर करावे, अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे.
–
“शालेय क्रीडा स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र स्पर्धांचे नियोजन विलंबाने होत असल्याने विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षक दोघेही संभ्रमात आहेत. एका विद्यार्थ्यासाठी तीन कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. अनेक शाळांमध्ये शेकडो खेळाडू असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे. शासनाने तातडीने वेबसाइट सुरू करून स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे, अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.” -सचिन झगडे (अध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ)

