• Sun. Jul 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

जेएसएस गुरुकुलच्या बाल वारकऱ्यांची भक्तिमय दिंडी; केडगाव परिसर विठ्ठलनामाने दुमदुमला

ByMirror

Jul 25, 2026
शिक्षणासोबतच संस्कारक्षम मुल्य रुजविणे महत्त्वाचे -आनंद कटारिया

‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या गजरात वारकरी वेशातील चिमुकल्यांनी वेधले सर्वांचे लक्ष


शिक्षणासोबतच संस्कारक्षम मुल्य रुजविणे महत्त्वाचे -आनंद कटारिया


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त केडगाव येथील जेएसएस गुरुकुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वारकऱ्यांच्या दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. टाळ-मृदंगाच्या निनादात, “ज्ञानोबा-तुकोबा”, “माऊली… माऊली…” अशा अखंड जयघोषात निघालेल्या दिंडीने वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेचे जिवंत दर्शन घडवले. वारकरी वेशभूषेतील चिमुकले विद्यार्थी, विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात सजलेली मुले-मुली आणि खांद्यावर पालखी घेऊन चालणाऱ्या बाल वारकऱ्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.


दिंडीचा प्रारंभ शाहूनगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजन करून करण्यात आला. त्यानंतर टाळ, मृदंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात दिंडीने मार्गक्रमण सुरू केले. दिंडी मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांची उधळण करून आणि विठ्ठलनामाचा जयघोष करत बाल वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव आणि वारकरी परंपरेप्रती असलेली आत्मीयता पाहून परिसरातील भाविकही भारावून गेले.


दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी हरिनाम कीर्तन, अभंगगायन आणि संत साहित्यावर आधारित भक्तिगीते सादर केली. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आणि वारकरी परंपरेतील संतांच्या शिकवणीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी भक्ती, समता, प्रेम आणि सेवाभावाचा संस्कार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. बालाजी कॉलनी मार्गे दिंडी स्वामी समर्थ मंदिरात पोहोचली. तेथे शांताबाई भजनी मंडळ, एकनाथ नगर यांच्या वतीने अभंग, गवळणी आणि विठ्ठलनामाचा जागर करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या साथीने झालेल्या भजन-कीर्तनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.


यावेळी प्राचार्य आनंद कटारिया यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संतपरंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा, सर्वधर्मसमभाव आणि नैतिक मूल्ये रुजावीत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. आधुनिक शिक्षणासोबतच संस्कारक्षम शिक्षण देण्यावर जेएसएस गुरुकुलचा भर असून, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी दरवर्षी अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


निकिता कटारिया म्हणाल्या की, आजच्या पिढीला वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी, विठ्ठलभक्तीचे महत्त्व समजावे आणि पंढरपूरच्या वारीमागील अध्यात्मिक भावना अनुभवता यावी, यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ऊन, पाऊस, वारा यांची पर्वा न करता लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. त्या भक्तीची, श्रद्धेची आणि समर्पणाची अनुभूती विद्यार्थ्यांनाही मिळावी, हा या उपक्रमाचा हेतू आहे. दिंडीमधून विद्यार्थ्यांना विठ्ठलभक्ती, सेवाभाव, शिस्त, सहकार्य आणि खरी भक्ती यांचे संस्कार मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


दिंडीचा समारोप प्रसाद वितरणाने करण्यात आला. या भक्तिमय आणि संस्कारक्षम उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी मनापासून स्वागत केले. दिंडीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *