भिंगारमध्ये श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये कायदे विषयक जनजागृती आणि व्यसनमुक्तीचा संदेश
भीती न बाळगता अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार, कायद्याचे ज्ञान आणि व्यसनमुक्त जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आणि समाजाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून आणि व्यसनांपासून कायम दूर राहून वाचन, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सकारात्मक छंदांचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. डी. चव्हाण यांनी केले.
भिंगार येथील श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कायदे विषयक जनजागृती कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षित मध्यस्थ तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲड. अनिल सरोदे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समितीचे सचिव ॲड. साहेबराव चौधरी, सामाजिक कार्यकर्ते संजय सपकाळ, प्राचार्य प्रमोद तोरणे, प्रभारी मुख्याध्यापक नारायण अनभुले, पर्यवेक्षिका कविता शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे न्यायाधीश आर. डी. चव्हाण म्हणाले की, “विद्यार्थीदशा ही आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील अवस्था आहे. याच काळात व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. शाळा विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देते, मात्र चुकीच्या संगतीमुळे अनेक विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जातात. एकदा व्यसनाची सवय लागल्यानंतर त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने चांगल्या मित्रांची निवड करावी, सकारात्मक विचार ठेवावेत आणि वेळेचा सदुपयोग करावा.”
यावेळी ॲड. अनिल सरोदे यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो (POCSO) कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. बालकांच्या संरक्षणासाठी हा कायदा किती महत्त्वाचा आहे, याबाबत त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “कोणत्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक अत्याचार सहन करू नका. अशा घटना घडल्यास भीती न बाळगता पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीला त्वरित माहिती द्या. गुन्हेगारांना कायद्याने कठोर शिक्षा होते. त्यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे ही प्रत्येक बालकाची जबाबदारी आहे. पालकांनीही मुलांशी सातत्याने संवाद साधून त्यांना सुरक्षिततेबाबत जागरूक केले करण्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे प्राथमिक ज्ञान, सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे उपाय, सामाजिक जबाबदारी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचे महत्त्व याबाबतही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून मान्यवरांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती घायतडक व आकांक्षा पडदूने यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका कविता शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच माध्यमिक, प्राथमिक आणि ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

