भाजप ओबीसी मोर्चा व भोयरे गांगर्डा ग्रामपंचायतीचा पुढाकार
वृक्ष लागवड व संवर्धन हीच खरी समाजसेवा व विठ्ठलभक्ती -लतिकाताई पवार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पंढरपूरला आषाढी वारीसाठी अहिल्यानगर शहरातून गेलेल्या वारकऱ्यांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. लायन्स क्लब व निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळाच्या जिल्हाध्यक्षा लतिकाताई पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील परिते येथील डीसीसी बँक शाखेच्या परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात डीसीसी बँकेचे शाखाधिकारी एच. बी. लामकाते, कुर्मदास साखर कारखान्याचे संचालक राहुल पाटील, परिते विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन हनुमंत बापू लांडे, विशाल मिस्किन, जे. के. काळे, बँकेचे कर्मचारी तसेच आषाढी वारीतील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. दिंडीतील छायाताई राजपूत, सुषमा दंडवते, पुष्पा वाकळे, संगीता देव्हारे, अनुसया दंडवते, सुनीता कानडे, गंगुबाई वाघ, सपना लाटे, केशर गांगर्डे, मंगल चव्हाण आणि शारदा दळवी यांच्यासह अनेक वारकऱ्यांनी वृक्षारोपणात सहभाग घेत पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
उपस्थितांनी वृक्ष लागवड करून स्व. अजित पवार यांना अभिवादनच केले. तर “एक वृक्ष म्हणजे अनेक पिढ्यांसाठी जीवनाचा श्वास” हा संदेशही समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. वारीच्या पवित्र वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे अध्यात्म आणि पर्यावरण संरक्षणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
लतिकाताई पवार म्हणाल्या की, वारी ही विठ्ठल भक्तीची परंपरा असून, त्याला वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यात आली आहे. आज पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यापेक्षा वृक्षारोपण करून त्यांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन केले, तर भविष्यातील पिढ्यांना निरोगी आणि हरित पर्यावरण मिळू शकते. वृक्ष लागवड ही एक दिवसाची कृती नसून त्याचे संगोपन हीच खरी समाजसेवा व विठ्ठलभक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
शाखाधिकारी एच. बी. लामकाते म्हणाले की, वृक्षारोपण हा पर्यावरण संरक्षणाचा सर्वात प्रभावी आणि शाश्वत मार्ग आहे. वारकऱ्यांनी आषाढी वारीसारख्या पवित्र यात्रेदरम्यान वृक्षारोपणाचा संदेश दिला, ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला, तर हवामान बदल, प्रदूषण आणि तापमानवाढ यांसारख्या गंभीर समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

