• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

पुणे–अहिल्यानगर–बीड मार्गावर ‘पसायदान एक्सप्रेस’ सुरू करण्याची मागणी

ByMirror

Jul 15, 2026
१९ जुलैच्या दिल्ली गेट सत्याग्रहातून केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाला घातले जाणार साकडे

१९ जुलैच्या दिल्ली गेट सत्याग्रहातून केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाला घातले जाणार साकडे


‘पसायदान एक्सप्रेस’ ठरेल शिक्षण, रोजगार आणि विकासाची जीवनवाहिनी — ॲड. कारभारी गवळी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पुणे–अहिल्यानगर–बीड या मार्गावर दररोज नियमित प्रवासी रेल्वे सेवा सुरू करून तिला ‘पसायदान एक्सप्रेस’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आली आहे.
रेल्वे ही केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन नसून शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, व्यापार आणि सामाजिक न्यायाची जीवनवाहिनी आहे. या मागणीसाठी रविवार, १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता अहिल्यानगर येथील ऐतिहासिक दिल्ली गेट येथे आयोजित ‘पसायदान राष्ट्रीय धारणा सत्याग्रहा’तून केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे साकडे घालण्यात येणार असल्याची माहिती पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
ॲड. गवळी यांनी सांगितले की, पुणे–अहिल्यानगर–बीड रेल्वेमार्ग उपलब्ध असतानाही या मार्गावर नियमित आणि थेट प्रवासी रेल्वे सेवा नसल्यामुळे हजारो प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार, रुग्ण, छोटे व्यापारी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना पुणे व अहिल्यानगरसारख्या शिक्षण, आरोग्य आणि उद्योग केंद्रांपर्यंत पोहोचताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे या मार्गावर तातडीने नियमित रेल्वे सेवा सुरू करणे ही काळाची गरज आहे.

बीड जिल्हा अनेक वर्षांपासून विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर राहिलेला जिल्हा मानला जातो. दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षणाच्या मर्यादित संधी, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, अपुऱ्या आरोग्यसेवा आणि आर्थिक संधींची कमतरता या समस्या आजही मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. अशा परिस्थितीत पुणे–अहिल्यानगर–बीड रेल्वे सेवा सुरू झाल्यास बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.


ॲड. गवळी म्हणाले की, ‘पसायदान एक्सप्रेस’ सुरू झाल्यानंतर बीडमधील विद्यार्थ्यांना पुणे आणि अहिल्यानगर येथील उच्च शिक्षण संस्थांपर्यंत सहज पोहोचता येईल. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या रुग्णांना सुरक्षित आणि परवडणारा प्रवास उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळेल, तर स्थानिक लघुउद्योग, व्यापारी आणि उद्योजकांनाही नवीन आर्थिक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे ही रेल्वे सेवा केवळ प्रवासापुरती मर्यादित न राहता विकासाला चालना देणारी प्रभावी यंत्रणा ठरेल.

‘पसायदान’ ही संत ज्ञानेश्वरांनी मांडलेली सर्वांच्या कल्याणाची, दुःखनिवारणाची, मैत्रीची आणि ज्ञानप्रसाराची संकल्पना आहे. त्यामुळे या रेल्वेला ‘पसायदान एक्सप्रेस’ हे नाव देणे म्हणजे केवळ नामकरण नसून सामाजिक समता, लोककल्याण आणि विकासाभिमुख शासनव्यवस्थेचे प्रतीक ठरेल. मराठवाड्याला ज्ञान, कौशल्य, आरोग्य, रोजगार आणि आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असेही ॲड. गवळी यांनी नमूद केले.


“बीडला दयेची नव्हे, तर संधीची गरज आहे,” असे स्पष्ट करत ॲड. गवळी म्हणाले की, केवळ अनुदाने आणि आर्थिक मदत देऊन दारिद्र्य दूर होणार नाही. नागरिकांना शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार आणि बाजारपेठांपर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. पुणे–अहिल्यानगर–बीड ‘पसायदान एक्सप्रेस’ ही त्या दिशेने उचलली जाणारी अत्यंत महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी पायरी ठरू शकते.
या सत्याग्रहातून रेल्वे मंत्रालयाकडे काही महत्त्वपूर्ण मागण्याही करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणारे अनारक्षित डबे उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांना विशेष प्रवास सवलती देणे, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच सकाळी पुण्याकडे जाणारी आणि संध्याकाळी बीडकडे परतणारी रेल्वेची वेळ निश्चित करणे, या मागण्यांचा समावेश आहे.


पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने नागरिकांना या सत्याग्रहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“पुण्याचे ज्ञान, अहिल्यानगरची मध्यवर्ती जोडणी आणि बीडची मानवी व कृषी क्षमता यांचा संगम घडविणारी ‘पसायदान एक्सप्रेस’ तातडीने सुरू करून मराठवाड्याच्या विकासाला नवी गती द्यावी,” अशी मागणी संघटनेने केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.
या मागणीसाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले आणि प्रकाश गोसावी आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *