‘दोषींवर कठोर कारवाई करा, कुटुंबाला नुकसानभरपाई व नोकरी द्या’; शिवसेना सामाजिक न्याय विभागासह ग्रामस्थांचा एल्गार
महामार्गावर तासभर वाहतूक ठप्प; सीआयडी चौकशी, मोक्का कारवाई आणि सुरक्षा अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मागासवर्गीय दलित कुटुंबातील श्रीकांत पोपट दोंदे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, उच्चस्तरीय चौकशी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत आणि पुनर्वसनाच्या मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 9 जुलै) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तासाहून अधिक काळ चाललेल्या आंदोलनामुळे नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, श्रीकांत दोंदे यांच्या हत्येनंतर वारंवार निवेदने, आंदोलने आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
यापूर्वी 12 जून रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेट बंद आंदोलन आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यापीठाच्या सुरक्षा कार्यालयाकडून लेखी आश्वासन देण्यात आले होते. त्यामध्ये कै. श्रीकांत दोंदे यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या विमा रकमेबाबत आवश्यक कागदपत्रे, म्हणजे मृत्यूचा दाखला, शवविच्छेदन अहवाल आणि वारस दाखला प्राप्त होताच मजूर पुरवठा करणाऱ्या ठेकेदारामार्फत पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, महिला जिल्हाप्रमुख उज्वला गवळी, मालन जाधव, पोपटराव दोंदे, रमाकांत दोंदे, सिंधुताई साळवे, ज्योती पाटोळे, सिद्धांत पाटोळे, प्रियांका कदम, भाऊसाहेब कदम, प्रमोद जौजाळ, भाऊसाहेब पंडित, कृष्णा कांबळे, कल्याण गायकवाड, इंदुबाई पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि दोंदे कुटुंबीय सहभागी झाले होते.
श्रीकांत दोंदे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. 2 जून 2026 रोजी कर्तव्य बजावत असताना त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असला तरी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग करून स्वतंत्र आणि निष्पक्ष यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. श्रीकांत दोंदे ज्या ठिकाणी कार्यरत होते, त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, पुरेशी प्रकाशयोजना नव्हती, सुरक्षा रक्षकांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नव्हते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित पाहणी होत नव्हती, असा आरोप करण्यात आला. या गंभीर निष्काळजीपणामुळेच दोंदे यांना आपला जीव गमवावा लागल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
यामुळे सुरक्षा अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे आणि या गुन्ह्यात त्यांचाही सहआरोपी म्हणून समावेश करण्यात यावा, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. श्रीकांत दोंदे हे आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शासन आणि विद्यापीठ प्रशासनाने तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला विद्यापीठात किंवा शासकीय सेवेत नोकरी देऊन पुनर्वसन करावे, अशी मागणीही करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर यापूर्वी चोरी, खून यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा करत या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्ह्यांची कठोर अंमलबजावणी करून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. याशिवाय महात्मा फुले कृषी विद्यापीठात रोजनदारीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याची मागणीही आंदोलनातून करण्यात आली. श्रीकांत दोंदे यांना न्याय मिळेपर्यंत आणि सर्व मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

