• Thu. Jul 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

राजमाता जिजाऊंना अनोखे अभिवादन! 32 ज्येष्ठांना मिळाली नवदृष्टी; अवयवदानाचा घेतला संकल्प

ByMirror

Jul 9, 2026
राजमाता जिजाऊंना अनोखे अभिवादन! 32 ज्येष्ठांना मिळाली नवदृष्टी; अवयवदानाचा घेतला संकल्प

फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम; मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेतून ज्येष्ठांच्या आयुष्यात पुन्हा उजेड


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रेरणेतून आणि राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत फिनिक्स सोशल फाऊंडेशनने राबविलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रमामुळे तब्बल 32 ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रकाश फुलला आहे. पुणे येथील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर हे सर्व ज्येष्ठ नागरिक नुकतेच अहिल्यानगरात परतले. शहरात आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ‘जय भवानी… जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. नव्याने मिळालेल्या दृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या ज्येष्ठांनी अवयवदानाचा संकल्प केला.


शहरात परतल्यानंतर फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या हस्ते सर्व ज्येष्ठ नागरिकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर प्रथमच स्पष्टपणे जग पाहण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत, “फिनिक्स फाऊंडेशनने आमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणला. आता आम्ही नव्या उत्साहाने जीवन जगू शकतो,” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.


समाजसेवेचा वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या फिनिक्स सोशल फाऊंडेशनने महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी केवळ औपचारिक कार्यक्रमांनी नव्हे, तर प्रत्यक्ष समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजऱ्या करण्याची परंपरा जपली आहे. याच परंपरेचा भाग म्हणून राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनी गरजू, उपेक्षित आणि दृष्टीदोषाने त्रस्त नागरिकांना नवदृष्टी देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.


फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये शेकडो नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत मोतीबिंदू झालेल्या 32 ज्येष्ठ नागरिकांची निवड करण्यात आली. त्यानंतर पुणे येथील के. के. आय. बुधराणी रुग्णालयात त्यांच्यावर पूर्णपणे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रुग्णांचा प्रवास, नेत्रतपासणी, शस्त्रक्रिया, औषधे, निवास तसेच इतर आवश्‍यक वैद्यकीय सुविधा पूर्णतः विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या.


याबाबत बोलताना फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक नागरिक केवळ पैशाअभावी आवश्‍यक उपचार घेऊ शकत नाहीत. विशेषतः मोतीबिंदूसारख्या आजारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण बनते. अशा गरजू नागरिकांना पुन्हा दृष्टी मिळवून देण्याच्या उद्देशाने फिनिक्स सोशल फाऊंडेशनने जिल्हाभर ‘दृष्टीदान’ची व्यापक चळवळ सुरू केली आहे.


ते पुढे म्हणाले, “राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचे संस्कार दिले. समाजहित, रयतेचे कल्याण आणि सेवाभाव हीच त्यांची खरी शिकवण होती. त्याच विचारांचा वारसा जपत फिनिक्स सोशल फाऊंडेशन समाजातील गरजू, उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी सातत्याने आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे.”
फाऊंडेशनच्या माध्यमातून दर महिन्याला मोफत नेत्र तपासणी शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे तसेच नेत्रदान आणि अवयवदानाबाबत जनजागृती मोहिमा राबविण्यात येतात. या उपक्रमांमुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळत असून समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे. यावेळी नवदृष्टी लाभलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करत, “आपल्याला समाजाकडून जे मिळाले, त्याची परतफेड समाजालाच करायची,” अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनी झालेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश देणारा ठरला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *