पत्रकार अन्सार सय्यद यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव
गाळेधारकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही थेट प्रश्नचिन्ह
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कोठला परिसरातील राज चेंबर्समध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याच्या कथित मनमानी व दादागिरीमुळे स्वतःच्या मालकीच्या कार्यालयातही प्रवेश मिळत नसल्याचा गंभीर आरोप पत्रकार तथा व्यावसायिक अन्सार राजू सय्यद यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित पदाधिकाऱ्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची व तसेच तात्काळ गेटची चावी मिळवून देण्याची मागणी केली आहे.
अन्सार सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राज चेंबर्समध्ये गेल्या 26 वर्षांपासून त्यांचा बॅटरी व्यवसाय असून त्याच ठिकाणी त्यांचे वृत्तपत्राचे कार्यालयही आहे व्यवसायानिमित्त व तसेच वृत्तपत्राच्या कामानिमित्त त्यांना अनेकदा रात्री उशिरापर्यंत कार्यालयात जावे लागते. मात्र, संबंधित भाजप पदाधिकारी दररोज रात्री सुमारे 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान मुख्य प्रवेशद्वाराला कामगारामार्फत कुलूप लावत असल्याने स्वतःच्या कार्यालयातही प्रवेश मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सय्यद यांनी म्हटले आहे की, रात्रीच्या वेळी गेट बंद झाल्यानंतर तो कामगार जाणून-बुजून फोनही उचलत नाही.परिणामी व्यवसायावर परिणाम होत असून वृत्तपत्राचे कामही वेळेत करता येत नाही. स्वतःच्या मालकीच्या कार्यालयात जाण्यासाठी दुसऱ्याची परवानगी घ्यावी लागणे ही अत्यंत दुर्दैवी आणि अपमानास्पद बाब असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे. राज चेंबर्सची कोणतीही अधिकृत किंवा नोंदणीकृत सोसायटी अस्तित्वात नाही. तसेच संपूर्ण इमारतीचे मालकी हक्क संबंधित भाजप पदाधिकाऱ्याकडे नसतानाही ते स्वतःचे नियम लादत आहेत. कोणत्याही अधिकृत ठरावाशिवाय किंवा सर्व गाळेधारकांची संमती न घेता संपूर्ण इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बेकायदेशीरपणे बंद करण्याचा अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सय्यद यांनी आपल्या तक्रारीत सुमारे 11 महिन्यांपूर्वी घडलेल्या एका घटनेचाही उल्लेख केला आहे. ‘गणेश’ नावाच्या व्यक्तीला झालेल्या कथित मारहाणीबाबत जाब विचारल्यानंतर संबंधित भाजप पदाधिकाऱ्याने शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्या घटनेचा राग मनात ठेवून आता गेटच्या चावीच्या माध्यमातून सूडबुद्धीने त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राज चेंबर्समध्ये सुमारे 225 ते 250 गाळे असून अनेक व्यापारी तेथे व्यवसाय करतात. मात्र, संबंधित भाजप पदाधिकारी स्वतःला संपूर्ण परिसराचा मालक समजून वागत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाच्या नावाचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे तसेच गेटची चावी मागितल्यास अत्यंत अश्लाघ्य भाषेत बोलले जात असल्याचेही सय्यद यांनी म्हटले आहे. त्यामुळे तेथील व्यापारी भीतीपोटी उघडपणे बोलण्यास तयार होत नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
याशिवाय, पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर काही व्यापाऱ्यांकडून रात्री नऊ वाजल्यानंतर गेट बंद ठेवण्यास हरकत नसल्याचे लेखी घेऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न संबंधित पदाधिकाऱ्याकडून केला जात असल्याचा आरोपही सय्यद यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे पोलीस प्रशासनाची कथेत निष्क्रियता. एप्रिल 2026 पासून तोफखाना पोलीस पोलीस निरीक्षक तपासी अधिकारी पोलीस उपाधीक्षक तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही प्रत्येक वेळी ‘कारवाई करू’ असे आश्वासन मिळाले. त्यांच्याबरोबर या संदर्भात दूरध्वनीवरूनही बोलणे झाले. प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप सय्यद यांच्याकडून करण्यात आला आहे. अशाप्रकारे हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे. दरम्यान संबंधित पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप होऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने कोणाच्या दबावामुळे तर पोलीस प्रशासन हात आखडता घेत नाही ना? असा प्रश्न सय्यद यांनी उपस्थित केला आहे. तरीदेखील या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पदाधिकाऱ्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी तसेच राज चेंबर्सच्या मुख्य प्रवेशद्वाराची एक चावी मला तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अन्सार सय्यद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.

