तोंडोळी परिसर हिरवागार करण्याचा निर्धार; रेणुकामाता मंदिर ते हरिहरेश्वर मंदिर परिसरात होणार वृक्षारोपण
आज झाडांची काळजी घेतल्यास, भविष्यात निसर्ग मानवाची काळजी घेईल -ह.भ.प. रमेश आप्पा महाराज
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आणि वटपौर्णिमेच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शंभर वडाच्या झाडांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी गावातून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणीय जाणीव एकत्रित करणाऱ्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
या अभियानाच्या प्रारंभी आयोजित कार्यक्रमाला ह.भ.प. रमेश आप्पा महाराज, ह.भ.प. हरिश्चंद्र महाराज दगडखैर, ह.भ.प. पोपट महाराज फुंदे, उपसरपंच सतीश वारंगुळे, विश्वस्त रामेश्वर लोहिया, गोपी काका, भाऊसाहेब काकडे, राजाभाऊ वारंगुळे, बाळासाहेब देवढे, दत्ताअण्णा वारंगुळे, मल्हारी वारंगुळे, विकास राठोड, कानिफनाथ वारंगुळे, अनिल दौंड, दत्ता मांडे, आदित्य शिंदे, दिनेश शिंदे, नवनाथ महाराज यांच्यासह जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, श्रीकृष्ण काकडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानांतर्गत तोंडोळी येथील रेणुकामाता मंदिर परिसर, तोंडोळी फाटा ते रेणुकामाता मंदिर या रस्त्याच्या दुतर्फा, हरिहरेश्वर मंदिर परिसर, धोम्य ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेला शिखर टेंभी परिसर तसेच अमरधाम तोंडोळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर वडाच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाबरोबरच भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी ह.भ.प. रमेश आप्पा महाराज यांनी जय हिंद फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “जय हिंद फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची चळवळ राबवत आहे. फाउंडेशनचे शिवाजी पालवे यांच्या पुढाकारातून जिल्हाभरात हजारो वडाच्या झाडांची लागवड झाली असून, पर्यावरण रक्षणासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. आज झाडांची काळजी घेतल्यास निसर्ग भविष्यात मानवाची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ह.भ.प. पोपट महाराज फुंदे यांनीही वटपौर्णिमेच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वागत करत, धार्मिक परंपरेसोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणारा हा आदर्श उपक्रम असल्याचे नमूद केले. उपसरपंच सतीश वारंगुळे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने लावण्यात येणारी सर्व झाडे जतन करून ती जगविण्याची जबाबदारी स्वीकारत, “वृक्ष लागवड ही केवळ सुरुवात आहे; त्यांचे संगोपन आणि संवर्धन हेच खरे पर्यावरण रक्षण आहे,” असे सांगितले. तसेच जय हिंद फाउंडेशनचे आभार मानत भविष्यातही अशा उपक्रमांना गावाचा सक्रिय पाठिंबा राहील, अशी ग्वाही दिली.

