• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

रामवाडीत असंघटित कामगारांची मोफत आरोग्य तपासणी

ByMirror

Jun 22, 2026
शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


आरोग्यवर्धिनी केंद्र कष्टकरी व असंघटित कामगारांसाठी ठरतोय आधार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर, संपूर्ण सुरक्षा केंद्र अहिल्यानगर, सुरक्षा क्लिनिक तसेच आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र रामवाडी-सर्जेपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने रामवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात असंघटित कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिराप्रसंगी शिबिरास श्रीमती रोहिणी बोरुडे (स्टाफ नर्स), डॉ. आकांक्षा हराळे, श्रीमती नीता उडानशिवे, विकास उडानशिवे, विनय इदे (समुपदेशक), सागर फुलारी (व्यवस्थापक, संपूर्ण सुरक्षा केंद्र), श्रीमती वैशाली कुलकर्णी, रोहन भांबळ तसेच राहुल खैरनार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. आकांक्षा हराळे यांनी आरोग्याचे महत्त्व स्पष्ट करताना आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या निरोगी असणे होय, असे सांगितले. त्यांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.


श्रीमती रोहिणी बोरुडे यांनी असंसर्गजन्य आजारांबाबत मार्गदर्शन करून नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली तसेच महिलांना आरोग्यविषयक सल्ला दिला. नीता उडानशिवे यांनी आरोग्य संवर्धन आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांविषयी माहिती दिली.

एचआयव्ही/एड्स जनजागृती विषयावर मार्गदर्शन करताना विनय इदे यांनी नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. एचआयव्ही, गुप्तरोग, कावीळ यांसारख्या आजारांच्या तपासण्या वेळेवर करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच रोहन भांबळ, वैशाली कुलकर्णी आणि सागर फुलारी यांनी विविध आजारांबाबत माहिती देऊन समुपदेशन केले.
शिबिरामध्ये थायरॉईड, उच्च रक्तदाब, मधुमेह, कावीळ, एचआयव्ही, गुप्तरोग, सिरम कॅल्शियम आदींच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. विविध रक्त तपासण्यांसाठी नावनोंदणीही करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी रामवाडी येथील आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कार्याचे विशेष कौतुक केले. परिसरातील कष्टकरी, असंघटित कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने जीवनदान ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. दैनंदिन मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांना मोफत व सहज उपलब्ध आरोग्यसेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या केंद्रामार्फत केले जात आहे.


रक्तदाब, मधुमेह, लसीकरण, माता-बाल आरोग्य सेवा, आरोग्य समुपदेशन, असंसर्गजन्य आजारांचे निदान आणि जनजागृती यांसारख्या विविध सेवांमुळे नागरिकांना मोठा आधार मिळत आहे. वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांमुळे अनेक आजारांचे लवकर निदान होऊन उपचार शक्य होत आहेत.


सामाजिक कार्यकर्ते विकास उडानशिवे म्हणाले की, “रामवाडी येथील आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र हे परिसरातील कष्टकरी व असंघटित कामगारांसाठी आशेचा किरण ठरले आहे. गरीब व सर्वसामान्य नागरिकांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे केंद्र करत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे काम या केंद्रामार्फत प्रभावीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिर यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सुरक्षा केंद्र, सुरक्षा क्लिनिक तसेच आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र रामवाडी-सर्जेपुरा येथील सर्व कर्मचारी व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *