• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

गुंडेगावचे समाजसेवक राजाराम भापकर गुरुजींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव

ByMirror

Jun 22, 2026
डोंगर फोडून रस्ते निर्माण करणाऱ्या जिद्दी व्यक्तिमत्त्वाच्या कार्याला सलाम

शाहू-फुले-आंबेडकर-साठे कलाम सामाजिक विचार मंच आणि जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मान


डोंगर फोडून रस्ते निर्माण करणाऱ्या जिद्दी व्यक्तिमत्त्वाच्या कार्याला सलाम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिद्द, चिकाटी आणि लोकहितासाठीच्या अथक परिश्रमांच्या बळावर डोंगर फोडून रस्ते निर्माण करणारे गुंडेगावचे 96 वर्षीय ज्येष्ठ समाजसेवक राजाराम आनंदराव भापकर गुरुजी यांना शाहू-फुले-आंबेडकर-साठे कलाम सामाजिक विचार मंच आणि जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. आपल्या असामान्य कार्यामुळे ‘माऊंटन मॅन’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या भापकर गुरुजींच्या लोकहितवादी योगदानाचा हा विशेष सन्मान करण्यात आला.


गेल्या अनेक दशकांपासून भापकर गुरुजी यांनी कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर डोंगर फोडून रस्ते तयार करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांची वाहतूक सुलभ झाली असून गावांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. समाजासमोर संघर्ष, कष्ट आणि लोककल्याणाची प्रेरणादायी परंपरा त्यांनी निर्माण केली आहे.


भापकर गुरुजींच्या कार्याच्या ठिकाणी सामाजिक विचार मंच आणि जयहिंद माजी सैनिक संस्थेचे पदाधिकारी त्यांनी त्यांचा ट्रॉफी, सन्मानपत्र आणि शाल प्रदान करून गुरुजींचा गौरव केला. या गौरव सोहळ्यास जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे, त्रिदल सैनिक संघाचे मारुती ताकपेरे, अहिल्यानगरचे अनुलोम विस्तारक रामभाऊ भालसिंग, सामाजिक विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, महाराष्ट्र अध्यक्ष गणेश ढोबळे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. सुनील सकट, उद्योजक सुदाम ढेमरे, युनूस पठाण, प्रदीप ससाणे, मुस्ताक पठाण, महिला अध्यक्षा उषाताई शिंदे, वंदना सकट, आरती सकट, वैष्णवी शिंदे आणि सार्थक शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


भापकर गुरुजी यांनी आतापर्यंत गुंडेगाव-कोळगाव खिंड मार्ग, गुंडेगाव-कोथुळ खंडोबा देवस्थान मार्गासह तब्बल सात रस्त्यांची निर्मिती केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे दुर्गम भागांतील संपर्क व्यवस्था सुधारली असून कोथुळ येथील खंडोबा देवस्थान परिसराच्या विकासालाही मोठी चालना मिळाली आहे. आज हा परिसर राष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या दिशेने वाटचाल करत असून निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे.


भापकर गुरुजींचे अथक परिश्रम, समाजाभिमुख कार्य आणि लोकहितासाठीच्या समर्पणामुळे ते ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले असून, त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने मेजर निळकंठ उल्हारे, डॉ. सुनील सकट आणि अशोक शिंदे यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान अनुलोम विस्तारक रामभाऊ भालसिंग यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. समारोपावेळी उपस्थित मान्यवरांनी भापकर गुरुजींना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *