दहा वर्षांचा पाणीप्रश्न अखेर मार्गी; ‘आश्वासनांवर नाही, कामांवर विश्वास’ नागरिकांच्या प्रतिक्रिया
प्रभाग 15 मधील ड्रेनेज लाईन, रस्ते आणि पाणी प्रश्नासंदर्भातील सर्व प्रलंबित कामे मार्गी लागणार -गितांजली काळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्रमांक 15 अंतर्गत रेल्वे स्टेशन रोड परिसरातील सागर कॉम्प्लेक्स व लगतच्या भागातील नागरिकांचा तब्बल दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर सुटणार आहे. माजी उपमहापौर तथा नगरसेविका गितांजली काळे, नगरसेवक दत्ता गाडळकर, सुजय मोहिते आणि पौर्णिमा गव्हाळे यांच्या प्रयत्नाने महापालिकेच्या माध्यमातून नवीन पाणीपुरवठा जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या भागातील अनेक नागरिकांना नळजोडणी असूनही कमी दाबाने पाणी मिळत होते. परिणामी आवश्यक असलेला पाणीपुरवठा नियमितपणे होत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी पाणी मिळविण्यासाठी मोटारींचा वापर करुन देखील पाणी मिळणे अवघड झाले होते. नागरिकांनी वारंवार केलेल्या मागण्या आणि पाठपुराव्याची दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. नवीन जलवाहिनीमुळे परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना पुरेशा दाबाने आणि नियमित पाणी मिळण्यास मदत होणार आहे. या कामामुळे परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनिल काळे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, ज्येष्ठ नेते गदादे, स्मिता होर्णे, कमल राऊत, मंगळ भुजबळ, प्रमिला पाटील, अरुणा आहेर, शुभांगी शहाणे, सुमन कर्णेकर, छाया जोशी, रेखा ढवळे, मीना शहाणे, सुजाता केदारी, प्रतिभा कुलथे, रेखा घोडे, आशा जमदाडे, स्मिता फडके, अमृता भूमकर, शैला दळवी, जयश्री मोरे, प्रिया गुंड, शुभांगी शहाणे, गौरी गेटमे, संपूर्णा सावंत, वंदना भुजबळ, मंदा खताळ, विठाबाई साळुंके, आशा हरेल, देवकी भापकर, प्रमिला गागरे, रेणुका मेहता, लता जाधव, राकेश सायखेडकर, कमलाकर जोशी, प्रतीक बनभैरु, सौरभ जावळे, ताराचंद ससे, नरेश भूमकर, निलेश गाजरे, सोमनाथ होराणे, केतन दळवी, रघुनाथ साळवे, सुनील घोडे, सुनिल हरेल आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
माजी उपमहापौर तथा नगरसेविका गितांजली काळे म्हणाल्या की, सागर कॉम्प्लेक्स येथील नागरिकांना नळ असूनदेखील पाणी मिळत नव्हते. कमी दाबाने पाणी येण्याची तक्रार मागील दहा वर्षांपासून होती. हा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. प्रभाग 15 मधील ड्रेनेज लाईन, रस्ते आणि पाणी प्रश्नासंदर्भातील सर्व प्रलंबित कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावली जात असल्याचे सांगितले.
नगरसेवक दत्ता गाडळकर म्हणाले की, मागील दहा वर्षे फक्त येथील नागरिकांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. मात्र शेवटपर्यंत त्यांना पाणी मिळाले नाही. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून नागरिकांची वचनपूर्ती करण्याचे काम या प्रभागातील नगरसेवक करत आहेत. मागील मोठ्या काळात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले, ही गंभीर बाब होती. त्याची तातडीने दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
माजी नगरसेवक विजय गव्हाळे म्हणाले की, सागर कॉम्प्लेक्स येथील नागरिकांनी सातत्याने पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हा प्रश्न मार्गी लागला नाही. निवडून आल्यानंतर स्थानिक नगरसेवकांनी तातडीने या कामासाठी निधी मंजूर करून हे काम मार्गी लावल्याचे सांगितले.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले की, नवीन पाण्याच्या लाईनचे नियोजन केल्याने या भागातील नागरिकांना मोटर न लावता पूर्ण दाबाने पाणी येणार आहे. प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. मनपा निवडणुकीनंतर चारही नगरसेवक लोकांसमोर जाऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठा निधी आणून हा प्रभाग समृद्ध केला जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
नवीन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी चारही नगरसेवकांचे आभार मानले असून आगामी काळातही प्रभागातील इतर मूलभूत सुविधांची कामे अशाच गतीने पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

