• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

आनंद योग केंद्राच्या प्रभात योग रॅलीने सावेडी परिसर दुमदुमला

ByMirror

Jun 21, 2026
आनंद योग केंद्राच्या प्रभात योग रॅलीने सावेडी परिसर दुमदुमला

250 साधकांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘करे योग, रहे निरोग’च्या घोषणांनी दिला आरोग्याचा संदेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आनंद योग केंद्राच्या वतीने सावेडी परिसरात प्रभात योग रॅली काढण्यात आली. यामध्ये सुमारे 250 योगसाधक, विद्यार्थी आणि योगप्रेमींनी या रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदविला. योगविषयक जनजागृती करणाऱ्या घोषणांमुळे संपूर्ण सावेडी परिसर योगमय वातावरणाने दुमदुमून गेला.


“करे योग, रहे निरोग”, “चला उठा योग करा”, “शिकू आणि शिकवू या, साऱ्या जगात योग नेऊ या” अशा प्रेरणादायी घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या आठ वर्षांपासून आनंद योग केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग रॅलीचे आयोजन करण्यात येत असून, यंदाही या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची ‘Yoga for Healthy Ageing’ (आरोग्यदायी वृद्धत्वासाठी योग) ही संकल्पना रॅलीत विशेष आकर्षण ठरली. या विषयावरील फलक आणि संदेशफलक सहभागींच्या हातात झळकत होते. योगामुळे सर्व वयोगटांतील व्यक्तींना निरोगी आणि सक्रिय जीवन जगता येते, हा संदेश या माध्यमातून देण्यात आला.


रॅलीदरम्यान भिस्तबाग चौकात योगसाधकांनी विविध योगासनांचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले. वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, सूर्यनमस्कार आदी योगप्रकारांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात योगसाधकांचे कौतुक करत त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. यानंतर शुभमंगल कार्यालयात आयुष मंत्रालयाने निर्धारित केलेल्या योग प्रोटोकॉलनुसार सामूहिक योगसाधनेचे आयोजन करण्यात आले. जवळपास 200 साधकांनी एकत्रितपणे योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानधारणा केली. विविध योगासनांच्या प्रात्यक्षिकांसह सहभागी साधकांनी उत्कृष्ट समन्वय आणि शिस्तीचे दर्शन घडविले.


आनंद योग केंद्राचे प्रमुख दिलीप कटारिया यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “जीवन आनंदी, निरोगी आणि व्याधीमुक्त जगायचे असेल तर योग हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मात्र आळस आणि कंटाळा यामुळे अनेकजण योगापासून दूर राहतात. लोकांना केवळ योगाचे शिक्षण देणे नव्हे, तर त्यांना प्रत्यक्ष योगाभ्यास करण्यास प्रवृत्त करणे हा आनंद योग केंद्राचा मुख्य उद्देश आहे.”


ते पुढे म्हणाले की, आनंद योग केंद्राच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार केला असून नवीन साधकही मोठ्या प्रमाणावर केंद्राशी जोडले जात आहेत. सावेडी परिसरातील नागरिकांनी या निशुल्क योग केंद्राचा लाभ घ्यावा. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि व्याधींनी त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी ‘चेअर योगा’चे नियमित प्रशिक्षण दिले जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.


या उपक्रमासाठी रेणावीकर शाळा, केशवराव गाडेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच मानसी कोकीळ, अंजली चौरे, जयश्री देशपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमात प्रशांत बिहाणी, दिलीप पवार, राजेंद्र कलापुरे, उषा पवार, पूजा ठमके, सोनाली जाधववार, डॉ. मनीषा जायभाय, रेखा हाडोळे, संगीता जाधव, राजुल कटारिया, स्मिता उदास, वंदना मुसळे, वैशाली गोखले, श्‍लोका रीक्कल आदींसह अनेक योगप्रेमी उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निहाल कटारिया, शंकर मिसाळ, राजेंद्र कलापुरे आणि सुरेश म्हस्के यांनी विशेष परिश्रम घेतले. योगाबाबत जनजागृती निर्माण करत नागरिकांना निरोगी जीवनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *