विद्यार्थ्यांनी घेतले योग, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे धडे
सर्व शाळेचे विद्यार्थी आले एकत्र
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे केंद्र सरकारच्या मेरा युवा भारत, नवनाथ विद्यालय, श्री नवनाथ युवा मंडळ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरात शालेय विद्यार्थी, युवक-युवती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत योगाबाबत जनजागृतीचा संदेश दिला. तर योगातून निरोगी जीवनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी सामूहिक योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संकल्प केला. यावेळी उद्योजक तथा योग शिक्षक बाळासाहेब शहाणे, डॉ. सुनिल गंधे आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बबन बनकर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. योगामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुदृढ राहते, एकाग्रता वाढते आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून येतात, असे सांगत त्यांनी योगाचे महत्त्व विशद केले.
योग शिबिरादरम्यान ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, सूर्यनमस्कार यांसारख्या विविध आसनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत प्रत्येक आसनाची माहिती जाणून घेतली. तसेच प्राणायाम आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून मनःशांती, तणावमुक्त जीवन आणि उत्तम आरोग्य कसे प्राप्त करता येते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहाराचे महत्त्वही पटवून देण्यात आले. बदलत्या जीवनशैलीत आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि पौष्टिक आहार यांचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे म्हणाले की, “योग आणि प्राणायाम हे निरोगी जीवनाचे आधारस्तंभ आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. भारताने संपूर्ण जगाला दिलेली योगाची देणगी आज जागतिक स्तरावर स्वीकारली जात आहे. योगाच्या माध्यमातून सक्षम, सुदृढ आणि संस्कारित पिढी घडविणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुनिल गंधे म्हणाले की, “योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, मानसिक संतुलन राखले जाते आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापक बबन बनकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी लहानपणापासून योगाची सवय लावल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. शाळा स्तरावर नियमित योगाभ्यासाला प्रोत्साहन देऊन निरोगी व गुणवंत विद्यार्थी घडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी “विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व आहे. योगामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, आत्मविश्वास आणि शिस्त वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले. या उपक्रमाला मेरा युवा भारतचे जिल्हा युवा समन्वयक सत्यजीत संतोष, नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, सचिव सुमन कुरेल, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

