नान्नज दुमाला येथील शेतकरी दाम्पत्याचा यशस्वी प्रयोग; पीपल्स हेल्पलाईनच्या जलसंवर्धन चळवळीला वाढता प्रतिसाद
‘पडलेला प्रत्येक थेंब जमिनीत जिरवा’ -ॲड. कारभारी गवळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जलसंकट, भूजलपातळीतील सातत्याने होणारी घट आणि अनिश्चित पावसाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाईनच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘रेन गेन बॅटरी’ जलसंवर्धन चळवळीला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. या उपक्रमाची परिणामकारकता आता प्रत्यक्ष दिसून येत असून, संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील शेतकरी विनायक गुंजाळ आणि बेबी गुंजाळ या दाम्पत्याने राबविलेल्या प्रयोगामुळे दुष्काळी परिस्थितीतही शेतातील ओलावा टिकून राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीपल्स हेल्पलाईनचे मार्गदर्शक ॲड. कारभारी गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत शेतीची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी गुंजाळ दाम्पत्याने आपल्या 35 एकर शेतीमध्ये मागील वर्षी पाच रेन गेन बॅटरी उभारल्या. या प्रयोगामुळे केवळ त्यांच्या शेतालाच नव्हे, तर परिसरातील भूजलसाठ्यालाही मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे.
रेन गेन बॅटरी म्हणजे केवळ खड्डे किंवा चर नसून, पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणारी एक प्रभावी जलसाठा व्यवस्था आहे. गुंजाळ दाम्पत्याने उभारलेल्या प्रत्येक चराची लांबी 20 फूट, रुंदी 7 फूट आणि खोली 8 फूट ठेवण्यात आली. या चरांमध्ये दगड, गोटे आणि वाळूचे स्तर भरून ते जमिनीच्या उताराच्या दिशेने सुमारे 100 फुटांच्या अंतरावर नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आले. पावसाचे वाहून जाणारे पाणी या चरांमध्ये साचते आणि दगड-वाळूच्या स्तरांमधून हळूहळू जमिनीच्या खोल भागात मुरते. त्यामुळे जमिनीखाली बारमाही ओलाव्याचा साठा निर्माण होतो. हा साठा केवळ एका हंगामापुरता मर्यादित राहत नाही, तर दीर्घकालीन परिणाम घडवून आणतो.
यंदाच्या दुष्काळी आणि कमी पावसाच्या परिस्थितीत अनेक भागांमध्ये पिकांना फटका बसला असताना गुंजाळ यांच्या शेतात मात्र जमिनीतील ओलावा टिकून राहिला. 2026 पर्यंत शेतातील मातीमध्ये पुरेसा आर्द्रतेचा साठा कायम राहिल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर झाला असून गहू, सोयाबीन आणि मका या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच शेतातील विहिरीची पाणीपातळीही समाधानकारक राहिली. विशेष म्हणजे या जलसंधारणाचा लाभ केवळ गुंजाळ यांच्या शेतापुरता मर्यादित न राहता शेजारच्या शेतजमिनींनाही झाला आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ‘विश्वकल्याण’ या भावनेचा प्रत्यय या प्रयोगातून येतो. स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे, तर संपूर्ण परिसराच्या हितासाठी केलेली कृती कशी परिणामकारक ठरते, याचे हे उदाहरण मानले जात आहे. एका शेतकऱ्याने केलेल्या जलसंवर्धनाच्या कामामुळे विहिरी, झाडे, पशुपक्षी आणि शेजारील शेतकरी यांनाही लाभ मिळत असल्याने हा प्रयोग सामाजिक जबाबदारीचे प्रतीक ठरत असल्याचे म्हंटले आहे.
टँकर, बोअरवेल किंवा पाणी खरेदीवर होणारा वाढता खर्च पाहता रेन गेन बॅटरी ही दीर्घकालीन आणि शाश्वत गुंतवणूक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकदा उभारणी केल्यानंतर योग्य देखभाल केल्यास ही व्यवस्था अनेक वर्षे कार्यरत राहते. त्यामुळे हा खर्च नसून भविष्यातील शेतीसाठीचे भक्कम भांडवल असल्याचे सांगितले जात आहे. या यशस्वी प्रयोगामागे शेतकरी बेबी गुंजाळ यांचेही तितकेच महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी विनायक गुंजाळ यांच्यासह जलसंवर्धनाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवत प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. त्यामुळे 35 एकर शेतीचे भवितव्य बदलण्यास मदत झाली असून त्या ‘पसायदान हरित क्रांती’च्या सह-शिलेदार ठरल्या आहेत. संतपरंपरेचा वारसा लाभलेल्या नान्नज दुमाला गावाने आता आधुनिक जलसंधारणाचेही आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. रेन गेन बॅटरीच्या माध्यमातून गावात जलसंवर्धनाची नवी दिशा मिळाली असून हे गाव इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनत असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.
प्रत्येक शेतजमिनीची माती, भूप्रदेश आणि भूगर्भीय रचना वेगळी असते. त्यामुळे काळी माती, मुरमाड जमीन किंवा खडकाळ क्षेत्र यानुसार तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच रेन गेन बॅटरीची उभारणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. “पाऊस किती पडला यापेक्षा पडलेला पाऊस किती जिरविला, यावर शेतीचे भविष्य अवलंबून आहे. एल निनोचे संकट असो वा हवामान बदलाचे आव्हान; जो शेतकरी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत अडवतो, तोच दुष्काळाला खऱ्या अर्थाने उत्तर देऊ शकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

