• Wed. Jun 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

शिक्षण पूर्ण करण्यासाठी भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत

ByMirror

Jun 17, 2026
‘शिकला तोच घडला’; शिक्षणासाठी वयाचे बंधन नाही -डॉ. पारस कोठारी

‘शिकला तोच घडला’; शिक्षणासाठी वयाचे बंधन नाही -डॉ. पारस कोठारी


शिक्षण दूत मोहिमेला प्रतिसाद; गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांनी घेतला रात्रशाळेत प्रवेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विविध कारणांमुळे अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडण्याच्या उद्देशाने शहरातील हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश देण्यात आला.


शाळेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘शिक्षण दूत’ मोहिमेअंतर्गत शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, नोकरी करणारे युवक-युवती तसेच विविध व्यवसायांमध्ये कार्यरत असलेले नागरिक यांनी रात्रशाळेतील विविध वर्गांमध्ये प्रवेश घेतला आहे. शिक्षणाची ओढ आणि स्वतःचे आयुष्य अधिक सक्षम करण्याची जिद्द बाळगणाऱ्या या विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी विशेष स्वागत करण्यात आले.


भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ पार पडला. यावेळी प्राचार्य सुनिल सुसरे, महादेव राऊत, अमोल कदम, उज्वला साठे, वृषाली साताळकर, अनुराधा दरेकर, वैशाली दुराफे, बाळासाहेब गोरडे, संदेश पिपाडा, गजेंद्र गाडगीळ, शिवा शिंदे, कैलास करांडे, गजेंद्र गाडगीळ, मंगेश भुते, अशोक शिंदे, प्रशांत शिंदे, स्वाती होले, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पारस कोठारी म्हणाले की, भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील मैत्रीपूर्ण नातेसंबंधातून शिक्षण दिले जाते. या शाळेची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे येथे एकाच वर्गात नवरा-बायको, सुन-सासू, आई-मुलगी तसेच वडील-मुलगा यांनी एकत्र शिक्षण घेऊन यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्याची अनेक उदाहरणे आहेत. शिक्षणासाठी कोणतेही वयोमर्यादेचे बंधन नसून शिक्षण घेण्याची इच्छा, जिद्द आणि आयुष्यात पुढे जाण्याची तयारी असणे आवश्‍यक आहे.


ते पुढे म्हणाले की, रात्रशाळेत केवळ पुस्तकांपुरते शिक्षण दिले जात नाही, तर विद्यार्थ्याला जीवनात सक्षमपणे उभे राहण्यासाठी आवश्‍यक असलेले मार्गदर्शन आणि कौशल्य विकासावरही विशेष भर दिला जातो. मासूम संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. दिवसभर उपजीविकेसाठी काम करून रात्री शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या कष्टाने शिक्षण पूर्ण करतात. त्यामुळे ‘शिकला तोच जीवनात घडला’ या उक्तीचा प्रत्यय येथे दररोज येतो. या रात्रशाळेतून शिक्षण पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांतील उच्च पदांवर कार्यरत आहेत. यंदाही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करावे आणि अधिकाधिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी रात्रशाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य सुनिल सुसरे यांनी शाळेत उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधा, गुणवत्तापूर्ण अध्यापन पद्धती तसेच मासूम संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणाची सविस्तर माहिती दिली. दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश भुते यांनी केले, तर आभार गजेंद्र गाडगीळ यांनी मानले. नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी, मानद सचिव संजय जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, अजित बोरा, अनंत फडणीस, डॉ. रमेश झरकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


—–
शहरातील एका 60 वर्षीय सराफ व्यावसायिकाचा शिक्षणासाठी प्रवेश
1982 मध्ये दहावी केलेल्या सराफ व्यावसायिक प्रमोद बुऱ्हाडे यांनी आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आहे. कौटुंबिक जबाबदारी व व्यवसायामुळे पुढील शिक्षण घेता आले नसल्याने त्यांनी तब्बल 44 वर्षांनी पुन्हा इयत्ता 11 वीसाठी प्रवेश घेतला असून, आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार घेऊन ते शाळेच्या पहिल्या दिवशी देखील हजर होते. यावेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *