मराठी भाषा संवर्धनासाठी प्रतिष्ठानचा महत्त्वपूर्ण उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि राजभाषा म्हणून मराठीच्या प्रभावी संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठान, अहिल्यानगर यांच्या वतीने राज्य, जिल्हा, तालुका व शहर स्तरावरील मराठी राजभाषा संवर्धन कृती समितीची कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन, संवर्धन आणि दैनंदिन व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर वाढावा, या उदात्त उद्देशाने ही कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषेसमोर अनेक आव्हाने निर्माण होत असताना, मातृभाषेचे अस्तित्व, समृद्ध साहित्य परंपरा आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकावर आहे. याच भावनेतून प्रतिष्ठानने राज्यभर मराठी भाषा संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी कृती समितीची स्थापना केली आहे.
यामध्ये ज्ञानदेव उंडे यांची राज्य कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर देविदास सोनटक्के यांची पूर्व विभाग उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. कैलास गुंजाळ यांची पश्चिम विभाग प्रदेश उपाध्यक्ष, सुषमा योगेश गंभीरे यांची राज्य सचिव, तर क्रांती घनश्याम सानप यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर राहुल मुक्तासाहेब मोरे यांची जिल्हा कार्याध्यक्ष, तेजश्री अशोक बेलेकर यांची अहिल्यानगर तालुका कार्याध्यक्ष, सौ.रूपाली ज्ञानदेव म्हस्के यांची भिंगार शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच उषाताई म्हस्के यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सदर नियुक्तीपत्रांचे वितरण मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुलोचना क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे सहकार्यवाहक तथा सचिव अमोल क्षीरसागर यांनी सूचना मांडली. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दत्तात्रय ससाणे, खजिनदार ज्ञानेश्वर दळवी, संचालक रूपाली दारुणकर, रुक्मिणी गीते यांनी सर्व नियुक्त्यांना अनुमोदन दिले.
यावेळी प्रतिष्ठानमध्ये कार्यरत असलेले शंकर चवलवाड, मकरंद हिंगे, सुरेखा दुधाडे, आशा घुले, अश्विनी बेरड, शीतल मोरे, छाया क्षीरसागर, ऋतुजा हारकर, गंगा भुंकन, कांचना म्याना, गणेश शिंदे आणि रमेश बांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अमोल क्षीरसागर यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे. भाषेचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. मराठी राजभाषा संवर्धन कृती समितीच्या माध्यमातून राज्यभर मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि उपयोजन अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल. भविष्यात विविध शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेला अधिक बळकटी देण्याचा संकल्प प्रतिष्ठानने केला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी गठीत करण्यात आलेली ही कार्यकारिणी आगामी काळात राज्यभर प्रभावीपणे कार्य करेल आणि मराठी भाषेच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

