• Wed. Jun 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

खडांबे विद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्त झालेले आप्पासाहेब शिंदे यांचा ग्रामस्थांकडून नागरी सत्कार

ByMirror

Jun 17, 2026
oplus_136380464‘विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे हेच माझे ध्येय’ -प्राचार्य आप्पासाहेब शिंदे

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह पायाभूत सुविधांसाठी देत असलेल्या योगदानाचा गौरव


‘विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे हेच माझे ध्येय’ -प्राचार्य आप्पासाहेब शिंदे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या खडांबे (ता. राहुरी) येथील श्री शाहू विद्या मंदिर विद्यालयात प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आप्पासाहेब शिंदे यांचा ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक आणि संस्थात्मक विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
खडांबे येथील विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यास कृषीभूषण सुरशिंग पवार, संजय नाना पवार, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज खळेकर, प्रभाकर हरिचंद्र, पै. राजकुमार आघाव, पै. अनिल गिऱ्हे, भरत पवार, विद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप भोरूडे यांच्यासह पंचक्रोशीतील माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी आप्पासाहेब शिंदे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी अनेक वर्षे विद्यालयात शिक्षक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. संस्थेकडे पाठपुरावा करून विद्यालयासाठी नवीन इमारती, विविध भौतिक सुविधा आणि शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


विद्यालयाच्या विकासासाठी स्थानिक ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांनी निधी उभारणीचे मोठे काम केले. त्यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या ‘गुणवंत गौरव योजना’ या उपक्रमासाठी सुमारे सात लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, चप्पल आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.


शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने उंचावत गेली असून विद्यार्थ्यांच्या निकालात आणि विविध स्पर्धांमधील सहभागातही लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी विद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात त्यांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा होता. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दूरवर जावे लागत नसून गावातच शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्राचार्यपदी नियुक्ती झाल्यानंतर ग्रामस्थांनी केलेला हा सत्कार त्यांच्या कार्याची पोचपावती असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. उपस्थितांनी विद्यालयाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


सत्काराला उत्तर देताना प्राचार्य आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, “हा सत्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून श्री शाहू विद्या मंदिर परिवारातील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि संस्थेचा एकत्रित प्रयत्नांचा गौरव आहे. मला मिळालेली प्राचार्यपदाची जबाबदारी ही केवळ पद नसून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची मोठी संधी आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, हीच माझी भूमिका राहिली आहे आणि पुढेही राहील. विद्यालयाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी दिलेले सहकार्य अमूल्य आहे. त्यांच्या पाठबळामुळेच अनेक विकासकामे पूर्ण करता आले असल्याचे त्यांनी सांगितले.


आगामी काळात विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणखी उंचावणे, आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे यावर भर दिला जाईल. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेली क्षमता ओळखून त्याला योग्य दिशा देणे हेच माझे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *