माता रमाई गौरव पुरस्कार प्राप्त डॉ. सीताताई भिंगारदिवे, गौतमीताई भिंगारदिवे यांचा सत्कार
धम्म परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संजय कांबळे यांचा विशेष सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई गौरव पुरस्कार प्राप्त झालेल्या रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सीताताई भिंगारदिवे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे यांचा भिंगार येथे सत्कार करण्यात आला. तसेच शहरात तिसरी धम्म परिषद यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल तथागत बुद्धिस्ट सोसायटी भारतचे संस्थापक अध्यक्ष संजय कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
भिंगार येथे आयोजित या सन्मान सोहळ्याचे अध्यक्षस्थान आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विलास साठे यांनी भूषविले.
कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमित काळे, युवक तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, युवक शहर कार्याध्यक्ष अजय बडोदे, युवक भिंगार शहराध्यक्ष महेश भिंगारदिवे, प्रतिकार फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय शिरसाठ, रिपाईचे शहराध्यक्ष संदीप वाघमारे, सुरेश भिंगारदिवे, शितल भिंगारदिवे, संघमित्र घोडके, सुवर्णा बनसोडे, संगीता घोडके, संगीता थोरात, अंबिका घोडके, विमल तांबे, शिला भिंगारदिवे, अल्पना भिंगारदिवे, सविता भिंगारदिवे, पद्मावती खंडागळे, जाईबाई गायकवाड, लता पगारे, अनिता पंडित, शारदा बागुल, शोभा आंग्रे, विमल भिंगारदिवे, जयश्री काळपुंड यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात अमित काळे यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, डॉ. सीताताई भिंगारदिवे या दलित पँथरच्या काळापासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. त्यांनी महिलांचे संघटन उभे करून विविध सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले आहे. गौतमीताई भिंगारदिवे यांनी कौटुंबिक वाद मिटविणे, समुपदेशनाद्वारे अनेक कुटुंबांना आधार देणे आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे कार्य केले आहे. तर संजय कांबळे यांनी धम्माच्या माध्यमातून समाजाला जोडून भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार व समाजात सुरु असलेल्या त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी हा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात विलास साठे यांनी आंबेडकरी चळवळीसमोरील सध्याच्या आव्हानांवर भाष्य करताना समाजातील युवक आणि महिलांनी संघटित होण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र आजही तितकाच महत्त्वाचा आहे. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, आंबेडकरी चळवळीचे मूळ उद्दिष्ट सामाजिक न्याय, समता आणि बंधुता प्रस्थापित करणे हे आहे. समाजात अजूनही अनेक स्तरांवर अन्याय, विषमता आणि भेदभाव दिसून येतो. अशा परिस्थितीत समाजातील कार्यकर्त्यांनी वैचारिक भूमिका अधिक मजबूत करून संविधानाच्या मूल्यांचा प्रसार केला पाहिजे. समाजातील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. धम्म चळवळीबाबत बोलताना त्यांनी भगवान बुद्धांनी दिलेला करुणा, प्रज्ञा आणि समतेचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा असल्याचे सांगितले. समाजात शांतता, बंधुभाव आणि वैचारिक प्रबोधन वाढविण्यासाठी धम्म परिषदा आणि सामाजिक उपक्रमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि धम्म प्रसाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या या मान्यवरांचा हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

