• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

रामदास आठवले यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही -सुनील साळवे (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष)

ByMirror

Jun 16, 2026
उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न; रिपब्लिकन पक्षाचा निषेध

उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न; रिपब्लिकन पक्षाचा निषेध


‘शिका’ हा बाबासाहेबांचा संदेशच आरक्षणाचा खरा पाया; समाजात दरी निर्माण करण्याऐवजी शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्यावर सातत्याने टीका करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला आहे. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींकडून अशा प्रकारचे प्रयत्न होत असून, त्यांचा पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी म्हटले आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याविरोधात अपप्रचार करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


साळवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष देशभर पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रामदास आठवले यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद भूषविण्याचा मान मिळालेल्या प्रमुख आंबेडकरी नेत्यांमध्ये रामदास आठवले यांचे नाव घेतले जाते. सलग तीन वेळा केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी सामाजिक न्यायासाठी प्रभावीपणे काम केले आहे.


विद्यार्थीदशेपासूनच रामदास आठवले यांनी सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. भारतीय दलित पँथरच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांमध्ये घडणाऱ्या अन्याय-अत्याचारांविरोधात त्यांनी संघर्ष उभारला. वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले. गावोगावी पँथरची चळवळ उभी करून सामाजिक न्यायाचा लढा अधिक व्यापक केला आणि महाराष्ट्रासह देशभर रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढविण्याचे कार्य केले.


राज्यात सध्या चर्चेत असलेल्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून काही लोक जाणीवपूर्वक रामदास आठवले यांना लक्ष्य करत आहेत. समाजामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप साळवे यांनी केला. प्रत्यक्षात आठवले यांची भूमिका समाजामध्ये फूट पाडण्याची नसून सर्व घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व समाजघटकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षणाशिवाय स्पर्धा परीक्षा, शासकीय सेवा आणि विविध क्षेत्रांतील संधी प्राप्त होऊ शकत नाहीत. आरक्षणाचा लाभ प्रभावीपणे घ्यायचा असेल तर समाजातील प्रत्येक कुटुंबाने शिक्षणाकडे गांभीर्याने पाहणे आवश्‍यक आहे, हीच भूमिका रामदास आठवले यांनी सातत्याने मांडली असल्याचे साळवे यांनी नमूद केले.


“इतर जातींनी आमचे आरक्षण लाटले” असा अपप्रचार करून समाजात भावाभावांमध्ये भांडणे लावणे, परस्परांविषयी अविश्‍वास निर्माण करणे किंवा दरी वाढविणे हा प्रश्‍नांचा मार्ग नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याऐवजी विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी शैक्षणिक सुविधा, मार्गदर्शन केंद्रे, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वसतिगृहे आणि शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. समाजाच्या प्रगतीचा खरा मार्ग शिक्षणातूनच जातो, अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतली असून रिपब्लिकन पक्ष त्याच विचारांवर कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेल्या सर्व गट-तटांतील नेत्यांचा आदर करण्याचे संस्कार रामदास आठवले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका करत नाही. मात्र, जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यात येत असून भविष्यात असे केविलवाणे प्रयत्न टाळावेत, असे आवाहनही साळवे यांनी केले.
संघर्षातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वावर टीका करून कोणीही मोठे होऊ शकत नाही. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या नेत्यांची बदनामी करण्याऐवजी समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सकारात्मक भूमिका घेणे हीच काळाची गरज असल्याचे साळवे यांनी म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *