तोडगा न निघाल्यास अमरण उपोषणाचा इशारा
बाबुर्डी घुमट येथील शेतजमिनीच्या रस्त्यावर अतिक्रमणाचा आरोप; दादासाहेब गायकवाड योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथील शिंदे मळा परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीत ये-जा करण्यासाठी असलेला पारंपरिक गाडी रस्ता बंद झाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित रस्ता तातडीने मोकळा करून द्यावा आणि शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी गोरख विश्वनाथ जाधव यांनी महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी कांताबाई जाधव, दिनेश निकाळजे, प्रिया निकाळजे, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मौजे बाबुर्डी घुमट (ता. जि. अहिल्यानगर) येथील गट क्रमांक 279 मधील शेतजमीन समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत सन 2007 पासून सात लाभार्थी खातेदारांना देण्यात आली आहे. या लाभार्थी शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतजमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्वापार गाडी रस्ता अस्तित्वात असून तो महसूल नकाशामध्येही नमूद असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
सदर रस्त्याचा वापर करून लाभार्थी शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेती मशागत, पेरणी, कापणी तसेच अन्य शेतीविषयक कामांसाठी ये-जा करत होते. मात्र अलीकडे शेजारील शेतकरी सर्जेराव काळे यांनी हा रस्ता नांगरून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित रस्ता पूर्णतः बंद झाला असून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जाणेही कठीण झाले आहे. परिणामी शेतीच्या कामांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू झाला असून शेती मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. अशा परिस्थितीत शेतात जाण्याचा मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. वेळेत मशागत आणि पेरणीची कामे झाली नाहीत तर उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गोरख जाधव यांनी प्रशासनाला विनंती करताना पूर्वीपासून अस्तित्वात असलेला रस्ता तातडीने खुला करून देण्यात यावा, तसेच संबंधित व्यक्तीस रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न करण्याबाबत समज द्यावी, अशी मागणी केली आहे. महसूल विभागाने याबाबत त्वरित हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कालावधीत रस्ता मोकळा करून न दिल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा शेतकरी गोरख जाधव यांनी दिला आहे.

