• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केला ‘प्रवेश महोत्सव’

ByMirror

Jun 16, 2026
शारदा विद्या मंदिरमध्ये नवे प्रवेश

अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम;


शारदा विद्या मंदिरमध्ये नवे प्रवेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, यासाठी अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या रिमांड होम केंद्रांतर्गत एका विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेद्वारे केंद्र स्तर शिक्षकांनी व मार्कंडेय माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक यांनी थेट विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून प्रवेश महोत्सव साजरा केला, तसेच शाळेत नवीन प्रवेश देखील निश्‍चित केले.


रिमांड होम केंद्रातील केंद्र स्तर विशेष शिक्षक उमेश शिंदे, रामेश्‍वर ढगे, मार्कंडेय माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीप छिंदम, निलेश आनंदास यांनी एका दिव्यांग विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याचे पुष्पगुच्छ देऊन अत्यंत उत्साहात स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली. केंद्र स्तर विशेष शिक्षक उमेश शिंदे यांनी या मुलाशी आपुलकीने संवाद साधला. तसेच पालकांशी चर्चा करताना त्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे योग्य समुपदेशन केले व शासनाकडून मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधांची सविस्तर माहिती दिली. मुख्याध्यापक संदीप छिंदम यांनी पालकांना आपल्या पाल्याला नियमित शाळेत पाठवण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले.


रिमांड होम केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी विशेष शिक्षक उमेश शिंदे आणि रामेश्‍वर ढगे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांतून काही दिव्यांग विद्यार्थ्यांचे ‘शारदा विद्या मंदिर’ मध्ये यशस्वीरित्या प्रवेश करण्यात आले. शाळेत प्रवेशावेळी मुख्याध्यापिका भक्ती पुराणिक यांनी या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांचा पुढील अभ्यासक्रम सुकर व्हावा याकरिता त्यांना शाळेच्या वतीने पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *