‘एक विद्यार्थी-एक झाड’चा पर्यावरणपूरक संदेश
प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे -लतिका पवार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाचे औचित्य साधत पुण्यश्लोक आहिल्यादेवी सेवा संघ संचलित तपोवन रोड परिसरातील आदर्श प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे पर्यावरणपूरक पद्धतीने स्वागत करण्यात आले. शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याच्या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्याला रोप भेट देण्यात आले. औक्षण, गुलाबपुष्प, मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण आणि खाऊ वाटप अशा विविध उपक्रमांमुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण शाळेच्या प्रांगणात निर्माण झाले होते.
नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर विद्यार्थ्यांना विविध प्रकारची रोपे भेट देण्यात आली. या रोपांची घरी लागवड करून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लिनेस क्लब व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळाच्या जिल्हाध्यक्षा लतिका पवार, इंजि. शांभवी कदम, मुख्याध्यापक अशोक शिंदे, सहशिक्षक नजन रभाजी, उषा गावडे, मंगल कासार, किरण टापरे, अंजली कटके, योगेश बेल्हेकर यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लतिका पवार म्हणाल्या की, प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन शिकण्याचा, स्वतःला घडवण्याचा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा दिवस असतो. विद्यार्थ्यांनी जिज्ञासा, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर सातत्याने प्रगती करत राहिले पाहिजे. आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. त्यांनी घेतलेले शिक्षण, मिळालेले संस्कार आणि अंगीकारलेली मूल्ये यांच्यावरच सशक्त समाजाची उभारणी अवलंबून आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून शिक्षकांचा आदर करावा, पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी स्वतःला तयार करावे. नवीन शैक्षणिक वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावण्याचा, पर्यावरणाचे रक्षण करण्याचा, स्वच्छता राखण्याचा आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याचा संकल्प करावा. शिक्षणासोबतच चांगले संस्कार आणि सामाजिक जाणीव जोपासणे ही आजच्या काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शिक्षणाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना पुस्तकांसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे रोपही मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना लतिका पवार यांच्या वतीने रोपांसह खाऊची भेट देण्यात आली. रोपांच्या भेटीतून पर्यावरणप्रेम, पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानाची वाटचाल आणि प्रेरणादायी मार्गदर्शनातून मूल्यशिक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे पालकांनीही कौतुक केले.

