पुण्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार गौरव; रक्तदान जनजागृतीच्या कार्याची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानले जाते. या विचाराला आयुष्यभर कृतीतून जपणारे आणि तब्बल 168 वेळा रक्तदान करून समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक भालके यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण 2026’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे येथील अल्बोस टेक्नॉलॉजी यांच्या सौजन्याने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, दि. 20 जून रोजी पुणे येथे आयोजित विशेष सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते भालके यांचा गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजक रोहित गांधी यांनी ही माहिती दिली. भालके यांच्या दीर्घकालीन समाजसेवेची आणि रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पुरस्कार निवड समितीने त्यांची निवड केली. मूळचे चांदा (ता. नेवासा) येथील रहिवासी असलेले अशोक भालके हे जिल्हा परिषद आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असतानाच त्यांनी समाजसेवेचा वसा जपला. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर मदत मिळावी, रक्तदानाबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान चळवळीत सहभागी व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
भालके यांनी केवळ स्वतः रक्तदान करण्यापुरते कार्य मर्यादित न ठेवता विविध गावांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, जनजागृती कार्यक्रम तसेच मार्गदर्शन उपक्रम राबविले. पुणे येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी साहित्यिक सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी, सिने अभिनेत्री माधुरी पवार, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, आशू सुरपूर, संदीप रासकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात समाजसेवा, शिक्षण, कला, साहित्य आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र भूषण 2026’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भालके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

