१० लाख युवकांना जोडण्याचा निर्धार; मुंढे यांच्या धडक कारवाईला जनतेने साथ देण्याचे आवाहन
‘ओळखा — तपासा — बदला’ या त्रिसूत्रीने भेसळखोरांवर राहणार लोकवॉच
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि धाडसी प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळीविरोधात सुरू केलेल्या व्यापक आणि कठोर कारवाईचे राज्यभरातून स्वागत होत आहे. त्यांच्या या मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने ‘फूडिसीन पाल्स’ हे राज्यव्यापी जनजागृती व लोकनिरीक्षण अभियान सुरू करण्यात येत आहे.
पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अन्न भेसळीविरोधातील लढा केवळ शासकीय यंत्रणेचा किंवा एखाद्या अधिकाऱ्याचा विषय राहू नये. महाराष्ट्रातील युवक, नागरिक, सामाजिक संघटना आणि ग्राहक यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही लढाई लोकचळवळ बनविणे ही काळाची गरज आहे.
राज्यातील बाजारपेठांमध्ये विक्री होणाऱ्या भाज्या, फळे, दूध, खाद्यतेले, मसाले, मिठाई, धान्य आणि विविध खाद्यपदार्थांमध्ये रासायनिक पदार्थ, कृत्रिम रंग आणि घातक घटकांची भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. ही केवळ ग्राहकांची आर्थिक फसवणूक नसून, जनतेच्या आरोग्यावर आणि भावी पिढ्यांवर होणारा गंभीर आघात आहे, असे पीपल्स हेल्पलाइनने म्हटले आहे.
संघटनेच्या मते, कॅन्सर, मधुमेह, किडनीचे विकार, यकृताचे आजार आणि इतर अनेक गंभीर आजारांच्या वाढत्या प्रमाणामागे दूषित आणि भेसळयुक्त अन्न हा महत्त्वाचा घटक ठरत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य कुटुंबे या संकटाचे मोठे बळी ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या ‘फूडिसीन पाल्स’ अभियानामागे ‘Foodicine’ अर्थात ‘अन्न हेच औषध’ ही संकल्पना आहे. निरोगी, सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न हेच उत्तम आरोग्याचे सर्वात प्रभावी औषध आहे, हा संदेश या अभियानातून दिला जाणार आहे.
‘फूडिसीन’ म्हणजे शुद्ध अन्न, सुरक्षित शेती आणि आरोग्यदायी जीवनशैली यांची त्रयी होय. ही त्रयी मानवी आरोग्य, पर्यावरण आणि शेती व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवू शकते, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या अभियानांतर्गत महाराष्ट्रभरातून १० लाख ‘फूडिसीन पाल्स’ तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे स्वयंसेवक आपल्या परिसरातील अन्न भेसळीच्या प्रकारांवर लक्ष ठेवून जनजागृती करतील आणि कायदेशीर कारवाईसाठी मदत करतील. अभियानाची संपूर्ण रचना ‘ओळखा — तपासा — बदला’ या त्रिसूत्रीवर आधारित आहे.
आपल्या परिसरातील अन्न भेसळीची लक्षणे, संशयास्पद उत्पादन केंद्रे, बेकायदेशीर कारखाने आणि गैरप्रकार ओळखणे, जबाबदारीने फोटो, व्हिडिओ, बिल, नमुने आणि इतर आवश्यक पुरावे गोळा करणे, तसेच संकलित पुरावे अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे कायदेशीर तक्रारीच्या स्वरूपात सादर करून कारवाईसाठी पाठपुरावा करणे, ही या त्रिसूत्रीची कार्यपद्धती असेल.
संघटनेने स्पष्ट केले आहे की, ही मोहीम पूर्णपणे कायदेशीर, शांततामय आणि लोकशाही मार्गाने राबविली जाणार आहे. समाजात लाखो जागरूक निरीक्षक निर्माण झाले, तर अन्न भेसळ करणाऱ्या घटकांवर प्रभावी नियंत्रण आणता येईल. त्यामुळे ही चळवळ नागरिकांच्या सहभागातून उभी राहणारी लोकशक्ती ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या अभियानात १८ ते ५५ वर्षे वयोगटातील कोणतीही तरुण-तरुणी सहभागी होऊ शकते. यासाठी कोणतीही शैक्षणिक अट किंवा परीक्षा नाही. समाजसेवेची भावना, आरोग्याविषयी जागरूकता आणि भेसळमुक्त महाराष्ट्र घडविण्याची इच्छा असणे आवश्यक आहे.
सहभागी स्वयंसेवकांना पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने मानद नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. तसेच अन्न भेसळ ओळखण्याच्या पद्धती, डिजिटल पुरावे संकलित करण्याचे तंत्र आणि कायदेशीर तक्रार प्रक्रिया याबाबत विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार असल्याची माहिती अशोक सब्बन यांनी दिली.
“प्रामाणिक अधिकारी तुकाराम मुंढे यांना यंत्रणेविरुद्ध एकट्याने लढू देऊ नका. अन्न भेसळीविरोधातील ही लढाई प्रत्येक घराच्या स्वयंपाकघराशी, प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याशी आणि महाराष्ट्राच्या भवितव्याशी संबंधित आहे. जर १० लाख ‘फूडिसीन पाल्स’ राज्यभर सक्रिय झाले, तर कॅन्सरमुक्त, निरोगी आणि आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडविणे अशक्य नाही,” असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या अभियानासाठी ॲड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. राज्यभर या अभियानाचा विस्तार करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

