कचरा वर्गीकरणाच्या उद्दिष्टाला बसतोय तडा
स्वच्छ व पर्यावरणपूरक अहिल्यानगरसाठी घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा आवश्यक -विकास उडाणशिवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शास्त्रशुद्ध आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्प्यांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास भाऊसाहेब उडाणशिवे यांनी केली आहे. नागरिकांकडून कचरा वर्गीकरणाबाबत सातत्याने जनजागृती केली जात असताना प्रत्यक्ष कचरा संकलन व्यवस्थेत आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने संपूर्ण प्रक्रियेची परिणामकारकता कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शहरातील विविध भागांत नागरिकांना घरगुती पातळीवर ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून सातत्याने केले जाते. अनेक नागरिकही पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूकता दाखवत कचरा वर्गीकरण करून देत आहेत. मात्र, हा वर्गीकृत कचरा संकलित करण्यासाठी येणाऱ्या अनेक घंटागाड्यांमध्ये स्वतंत्र कप्प्यांची व्यवस्था नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी नागरिकांनी वेगळा केलेला कचरा संकलन प्रक्रियेदरम्यान पुन्हा एकत्र होण्याची शक्यता निर्माण होत असून, त्यामुळे कचरा वर्गीकरणाच्या संकल्पनेलाच धक्का बसत असल्याचे उडाणशिवे यांनी नमूद केले.
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते तथा कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास भाऊसाहेब उडाणशिवे म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापन ही केवळ नागरिकांची जबाबदारी नसून प्रशासनाचीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून ओला व सुका कचरा वेगळा दिल्यानंतर तो तसाच स्वतंत्र स्वरूपात प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी घंटागाड्यांमध्ये स्वतंत्र कप्पे असणे ही मूलभूत गरज आहे. अन्यथा नागरिकांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाते आणि संपूर्ण व्यवस्थेचा उद्देशच निष्फळ ठरतो.
त्यांनी पुढे सांगितले की, शहरातील सर्व घंटागाड्यांचे महानगरपालिकेने तातडीने सर्वेक्षण करून ज्या वाहनांमध्ये स्वतंत्र कप्प्यांची व्यवस्था नाही, त्या वाहनांमध्ये आवश्यक बदल करावेत. ओला आणि सुका कचरा वेगळा संकलित व वाहतूक करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारल्यास कचऱ्याचे पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया आणि विल्हेवाट अधिक परिणामकारकपणे करता येईल. यामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागेल. उडाणशिवे यांनी नागरिकांमध्ये जनजागृतीबरोबरच प्रत्यक्ष अंमलबजावणी, नियमित देखरेख आणि जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. घनकचरा व्यवस्थापन ही केवळ कागदोपत्री योजना न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी कचरा वेचक, भंगार कामगार आणि पुनर्वापर क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या भूमिकेचाही विशेष उल्लेख केला. हे कामगार शहरातील घनकचरा व्यवस्थापन साखळीतील महत्त्वाचा घटक असून पर्यावरण संवर्धनात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग करून अधिक सक्षम आणि परिणामकारक कचरा व्यवस्थापन प्रणाली विकसित करता येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनात आवश्यक सुधारणा करून घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा संकलनासाठी स्वतंत्र कप्प्यांची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत यांच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांच्या सहकार्याला पूरक अशी यंत्रणा उभारल्यास ‘स्वच्छ अहिल्यानगर’चे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होऊ शकणार असल्याचे उडाणशिवे यांनी स्पष्ट केले.
