• Fri. May 29th, 2026

सुनिल सकट यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार

ByMirror

May 29, 2026

मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सन्मान


‘भाजपचा कार्यकर्ता समाजसेवेतून आदर्श निर्माण करतो’ -राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक, पर्यावरण आणि वंचित घटकांसाठी सातत्याने कार्य करणारे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस सुनिल सकट यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. दिल्ली येथील ‘मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड फाऊंडेशन’च्या वतीने नुकतीच त्यांना सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.


शिर्डी येथे आयोजित भाजपच्या प्रशिक्षण वर्गात हा सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुनिल सकट यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, मुकुल गंधे, ॲड. देवेंद्र बंब, सावेडी मंडलाध्यक्ष ॲड. कुणाल वाणे, अंशुमन वाणे आदी उपस्थित होते.


यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करीत असल्याचे सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत राजकारणात कार्य करणे हीच खरी लोकसेवा असल्याचे त्यांनी नमूद केले. सुनिल सकट यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही समाजकार्याचा ध्यास सोडला नाही, याचे विशेष कौतुक करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


सुनिल सकट यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत. गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी मदतकार्य, पर्यावरण संवर्धन मोहिमा, सामाजिक जनजागृती, तसेच युवकांना प्रेरणा देणारे उपक्रम यांच्या माध्यमातून त्यांनी समाजात वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित ‘साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने’ देखील करण्यात आला आहे.


सत्काराला उत्तर देताना सुनिल सकट म्हणाले की, “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी काम करणे हीच माझी खरी प्रेरणा आहे. सामाजिक कार्यासाठी भाजपच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ मिळाले असून, भविष्यातही अधिक जोमाने समाजसेवा करत राहणार आहे.” कार्यशाळेत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुनिल सकट यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *