सुनिल सकट यांना दिल्लीचा मानद डॉक्टरेट
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गौरव; सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांना दिल्लीस्थित ‘मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड फाऊंडेशन’च्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या मानाच्या पदवीचा स्वीकार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते त्यांनी केला. यावेळी आमदार जगताप यांनी सकट यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी डॉ. काशीनाथ सुलाखे, छावा संघटनेचे प्रदेश युवा सचिव दत्ता वामन, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते विजय वडागळे, ज्येष्ठ समाजसेवक नामदेवराव चांदणे, मानवी हक्क अभियानचे जिल्हा संघटक अशोक भोसले, राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष आनंद राठोड, भाजपा शहर उपाध्यक्ष संतोष शिरसाठ, अँटी रॅगिंग फोर्सचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब शिंदे, ग्राहक मार्गदर्शन मंचाचे भैय्या पठाण, मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष लखन साळवे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण साबळे, शिक्षक राहुल जाधव, वंदना सकट आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सुनिल सकट यांनी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सातत्याने समाजासाठी कार्य केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी पर्यावरण, शिक्षण, आरोग्य आणि मानवतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम उभे केले आहे. अशा कार्यकर्त्यांचा सन्मान होणे ही अहिल्यानगरसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांची कार्यप्रेरणा युवकांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुनिल सकट यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही समाजसेवेचा वसा जपत अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव यापूर्वीही महाराष्ट्र शासनाच्या ‘साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने’ करण्यात आलेला आहे. समाजहिताच्या विविध उपक्रमांत त्यांनी स्वतःच्या खर्चातून योगदान देत अनेकांना मदतीचा हात दिला आहे.
कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी निष्काम भावनेतून गरजू नागरिकांना मदत केली. विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू कुटुंबांना अन्नधान्य सहाय्य, नियमित रक्तदान, शहरात स्वच्छता मोहीम, विविध ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धन, सामाजिक प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा, न्यायासाठी उपोषण, मोर्चे व आंदोलने अशा विविध माध्यमांतून त्यांनी सातत्याने समाजकार्य केले आहे.
तसेच नवजात मुलींच्या जन्माचे स्वागत करून समाजात सकारात्मक संदेश देणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करणे, महिलांना सामाजिक कार्यात पुढाकार घेण्यासाठी प्रोत्साहित करणे अशा उपक्रमांमुळे त्यांची समाजातील ओळख अधिक दृढ झाली आहे. मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून त्यांनी मानवतावादी विचारांचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
सत्काराला उत्तर देताना सुनिल सकट म्हणाले की, मला मिळालेली मानद डॉक्टरेट ही केवळ माझा सन्मान नसून समाजकार्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा गौरव आहे. समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी काम करत राहणे हीच माझी खरी प्रेरणा आहे. भविष्यातही सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करत राहणार असून समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सकट यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत ‘मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड फाऊंडेशन’ने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
