• Mon. May 4th, 2026

नसरापूर अत्याचार प्रकरण; नराधमास फाशीची मागणी

ByMirror

May 4, 2026

रिपाइंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; रिपाइ आक्रमक

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 3 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) यांच्या वतीने आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


या संदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्यासह दानिश शेख, विजय शिरसाठ, गुलाम शेख, स्वप्नील साठे, अभिजित पंडित, योहान चाबुकस्वार, जमीर सय्यद, चिकू गायकवाड, निजाम शेख, जावेद सय्यद, इम्रान शेख, संपदा म्हस्के, मनीषा गायकवाड, विश्रांती पठारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भीमराव कांबळे या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने केवळ तीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. ही घटना संपूर्ण मानवतेला काळिमा फासणारी असून, समाजमनाला सुन्न करणारी आहे. या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.


विशेष म्हणजे, संबंधित आरोपीवर यापूर्वीही लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होता आणि त्याने शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर पुन्हा असे घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, असे तीव्र मत रिपाइच्या वतीने व्यक्त करण्यात आले.


तसेच, बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी लागू असलेला ‘पॉक्सो’ कायदा (POCSO) अधिक कठोर करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटू नये, यासाठी न्यायव्यवस्थेत आवश्‍यक त्या सुधारणा करण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस कोणालाही होणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. आरोपीस कठोर शिक्षा झाली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *