• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

मुख्याध्यापक शेख युनुस अकबर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

ByMirror

May 2, 2026
मुख्याध्यापक शेख युनुस अकबर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

उर्दू मुख्याध्यापक असोसिएशनच्या वतीने 32 वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा सन्मान


शिक्षकांनी घडवलेली विद्यार्थ्यांची पिढी हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख -संध्याताई गायकवाड (शिक्षणाधिकारी)

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा उर्दू मुख्याध्यापक असोसिएशनच्या वतीने अँग्लो उर्दू हायस्कूल, जामखेडचे मुख्याध्यापक शेख युनुस अकबर यांच्या 32 वर्षांच्या उल्लेखनीय सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सपत्निक सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ व समर्पित योगदानाची दखल घेत हा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
अंजुमन तरक्की-ए-तालीम खर्डा, जामखेड संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल जामखेडचे मुख्याध्यापक शेख युनुस अकबर यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर यांनी भूषवले, तर माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड प्रमुख उपस्थित होत्या.


कार्यक्रमास संस्थापक सचिव मुप्टा शि. संघटनेचे सुनिल मगरे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन अप्पासाहेब शिंदे, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, माजी सहा. आयुक्त व कास्ट्राईबचे राज्य अध्यक्ष एन.एम. पवळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडीत, प्रा.जि.आय.टी.आय. चे प्रा. खालिद जहागिरदार, विशेष सहा. सरकारी वकील ॲड. तौसीफ बागवान, सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख, डॉ. शेख तसनीम सदफ युनुस यांसह शिक्षण, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड म्हणाल्या की, “श्री. शेख युनुस अकबर सर यांचा 32 वर्षांचा सेवाप्रवास हा शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य निस्वार्थ सेवा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी घडवलेली विद्यार्थ्यांची पिढी हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. निवृत्तीनंतरही त्यांचा अनुभव व मार्गदर्शन समाजासाठी मोलाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. उबेद शेख यांनी शेख युनुस यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.


अध्यक्षीय भाषणात माजी शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर यांनी सांगितले की, “शेख युनुस अकबर यांनी अँग्लो उर्दू हायस्कूल, जामखेड येथे कार्य करताना केवळ शैक्षणिक गुणवत्ताच उंचावली नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही मोलाचे योगदान दिले. अशा कर्तव्यनिष्ठ शिक्षकांमुळेच शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम बनते. निवृत्ती हा त्यांच्या कार्याचा शेवट नसून नव्या अध्यायाची सुरुवात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शेख युनुस अकबर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या सहवासातील विविध आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडले असून, त्यांनी उभारलेला शैक्षणिक वारसा दीर्घकाळ स्मरणात राहील, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला. समारोप प्रसंगी शेख युनुस अकबर यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्हा उर्दू मुख्याध्यापक असोसिएशनच्या आजी-माजी मुख्याध्यापकांचे सहकार्य लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *