महिलांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण
70 दिवस उलटूनही आरोपी मोकाट; मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नितीन शिरसाठ यांच्या निर्घृण खुनातील आरोपींना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिरसाठ कुटुंबीयांसह गावातील महिलांनी सोमवारी (दि. 27 एप्रिल) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या उपोषणात स्वाती नितीन शिरसाठ, शारदा शिरसाठ, स्वाती शिरसाठ, आशा आल्हाट, उषा शिरसाठ, वंदना शिरसाठ, तेरेसा शिरसाठ, वैशाली मगर, नंदा साळवे, शिवबा साळवे, रोहिणी गायकवाड, पल्लवी हिवाळे, सविता शिरसाठ यांसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी घोडेश्वरी हॉस्पिटल, घोडेगाव (ता. नेवासा) येथे नितीन शिरसाठ यांची भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला तब्बल 70 ते 80 दिवस उलटूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. मृत नितीन शिरसाठ यांच्या पत्नीने अत्यंत भावनिक शब्दांत आपली व्यथा मांडताना सांगितले की, “मी त्या घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित होते. आमची 3 महिन्यांची मुलगी आहे व आणखी पाच लहान मुले आहेत. आरोपी अजूनही मोकाट असल्याने आमच्या कुटुंबावर केव्हाही हल्ला होऊ शकतो. आम्हाला सतत भीतीच्या छायेत जगावे लागत आहे.” तसेच, आरोपींना कोणीतरी पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त करत, “पोलीस प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे?” असा सवालही कुटुंबीयांनी उपस्थित केला.
सदर प्रकरणातील आरोपी हे ‘फुलमाळी टोळी’शी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या टोळीवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती असून, पोलीस प्रशासनाला याची पूर्ण कल्पना असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तरीही त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही टोळी संघटित पद्धतीने गुन्हे करत असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होणे अत्यावश्यक आहे. केवळ आश्वासन देऊन वेळकाढूपणा करण्याऐवजी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी उपोषणकर्त्या महिलांनी व्यक्त केली.
नितीन शिरसाठ हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिरसाठ कुटुंबीय व महिलांनी दिला आहे.
