• Sun. Feb 15th, 2026

आमी संघटनेची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

ByMirror

Feb 14, 2026

उद्योगांच्या प्रश्‍नांवर एकजुटीचा निर्धार -अध्यक्ष जयद्रथ खाकाळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उद्योजक व कंपन्यांच्या विविध प्रश्‍नांवर सातत्याने कार्यरत असलेल्या नगर एमआयडीसीतील आमी संघटनेची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व जेष्ठ उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सभेप्रसंगी जनरल सचिव सागर निंबाळकर, सचिव प्रफुल्ल पारख, चिन्मय सुखटणकर, सहसचिव सतीश गवळी, खजिनदार सुमित लोढा, राजेंद्र कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेताना सांगितले की, उद्योजकांनी एकत्र येऊन आमी संघटनेची स्थापना केली. “उद्योजकांनी एक छोटेसे रोपटे लावले होते, आज ते मोठे वटवृक्ष झाले आहे. उद्योगांचे प्रश्‍न सोडविणे, शासन-प्रशासनाशी संवाद साधणे आणि एमआयडीसीतील सुविधा सक्षम करणे, हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती हा उद्योजकांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न होता. या विषयावर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि अखेर हे काम पूर्ण झाले. कोरोनाकाळात शहराची गरज ओळखून आमी संघटनेच्या माध्यमातून ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आला. हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा उत्तम आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले.


संघटनेच्या वतीने कंपन्यांसाठी एक हॉल उभारण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार आमी संघटनेच्या कार्यालयाचे काम पूर्ण करून स्व. अशोकराव सोनवणे यांच्या नावाने हॉलची उभारणी करण्यात आली. याच नव्या हॉलमध्ये संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. “उद्योजकांची एकजूट हीच आपली खरी ताकद आहे. संघटनेच्या माध्यमातून काम करताना सर्वांची साथ मिळते, त्यामुळे उद्योगांच्या प्रश्‍नांवर प्रभावीपणे पाठपुरावा करता येतो,” असे खाकाळ यांनी सांगितले.


या सभेचे प्रास्ताविक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. मागील वर्षाचा आढावा उपाध्यक्ष चिन्मय सुखटणकर यांनी सादर केला. तर आर्थिक ताळेबंदाचे वाचन खजिनदार सुमित लोढा यांनी केले. सूत्रसंचालन सचिन पाठक यांनी केले. यावेळी जेष्ठ उद्योजक दौलत शिंदे, राजेश जगी, मिलिंद कुलकर्णी, संजय बंदिष्टी, गणेश कोलार, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


तसेच उद्योजकांना उत्कृष्ट यश मिळवल्या बद्दल अनेक पुरस्कार प्रदान होत असतात तर अशा उद्योकांना सन्मानित करण्यात आले आहे. उद्योगांच्या समस्या, एमआयडीसीतील सुविधा, उद्योजकांचे हित आणि भविष्यातील दिशा यावर त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. सभेच्या शेवटी संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी सर्व सदस्यांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *