• Wed. Feb 5th, 2025

उपोषणकर्त्या महिलेस जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या डॉक्टरवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी

ByMirror

Jun 30, 2022

रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर बस स्टॅण्ड समोरील एका मोठ्या हॉस्पिटल समोर उपोषण करणार्‍या महिलेला खासगी बाऊन्सर सोबत येऊन जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍या डॉक्टरवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाई (गवई) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती पवार, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, गुलामअली शेख, संतोष पाडळे, विजय शिरसाठ आदी उपस्थित होते.


तारकपूर बस स्टॅण्ड समोरील मोठ्या हॉस्पिटलच्या एका डॉक्टराने पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम पुढे करुन महापालिकेच्या जागेत चौदा वर्षापासून चहा व नाष्ट्याची हातगाडी लावणार्‍या महिलेस हटविल्याने महिलेच्या कुटुंबीयांवर उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे. सदर महिलेने रोजी-रोटीसाठी सदर जागेवर व्यवसायासाठी पुन्हा हातगाडी लावू देण्याच्या मागणीसाठी दि.23 जून रोजी हॉस्पिटल समोर मुला-बाळांसह उपोषण केले होते. मात्र संध्याकाळी त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने खासगी बाऊन्सर सोबत येऊन सदर महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. उपोषणकर्त्या महिलेने तोफखाना पोलीस स्टेशनला फिर्याद दिली मात्र त्या डॉक्टर विरोधात फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे प्रकरण संध्याकाळी सात ते आठ वाजल्याच्या सुमारास त्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला असून, पोलीसांनी तो व्हिडिओ फुटेज तपासल्यास खरी घटना त्यांच्या समोर येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


व्हिक्टोरिया फ्रान्सिस जॉर्ज ही महिला मागील चौदा वर्षापासून तारकपूर समोरील एका मोठ्या खासगी हॉस्पिटल समोर महापालिकेच्या जागेत चहा व नाष्टा सेंटरची गाडी लावून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत होती. मात्र खासगी हॉस्पिटलच्या त्या डॉक्टरने गोड बोलून पेव्हिंग ब्लॉकचे काम झाल्यानंतर पुन्हा हातगाडी लावण्याचे सांगितल्याने सदर महिलेने आपली हातगाडी हटवली. काम पूर्ण झाल्यावर सदर महिलेला त्या जागेत हातगाडी लावण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर डॉक्टरवर त्वरीत अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर महिलेला न्याय देण्याची मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *