रस्त्याच्या नावाखाली प्लॉट बळकावल्याचा आरोप
न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण -पवन भिंगारदिवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार हद्दीतील बाराबाभळी परिसरात गोरगरीब नागरिकांच्या जमिनीवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी केला आहे. बाराबाभळी येथील गट क्रमांक 92 अ/2ब मधील जमिनीमध्ये कोणतीही अधिकृत प्रक्रिया न राबवता रस्ते टाकण्यात आल्याने अनेक गोरगरिबांचे बिनशेती प्लॉट रस्त्यात गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संबंधित कुटुंबे भूमिहीन होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भिंगारदिवे यांनी सांगितले की, बाराबाभळी ग्रामपंचायत हद्दीतील काही राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे गोरगरीब नागरिकांच्या प्लॉटवर जबरदस्तीने रस्ता टाकण्यात आला. संबंधित जमीनमालकांची कोणतीही लेखी संमती न घेता तसेच अधिकृत भूसंपादन प्रक्रिया न करता हा प्रकार करण्यात आल्याने गोरगरिबांची सरळसरळ फसवणूक झाली आहे. अनेक कुटुंबांनी आयुष्यभराची कमाई गुंतवून हे प्लॉट घेतले होते; मात्र आता त्यांच्या जमिनीवरच रस्ता गेल्याने त्यांचा हक्क हिरावला गेला आहे.
या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, रस्त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना त्यांची जमीन परत द्यावी किंवा पर्यायी योग्य प्लॉट उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा संबंधित रस्ता बंद करून मूळ स्थिती पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी पवन भिंगारदिवे यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, संबंधित महसूल अधिकारी व प्रशासनाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी दिला आहे.
