कबीर परमेश्वर निर्वाण दिनानिमित्त तीन दिवसांचा भव्य धार्मिक व सामाजिक सोहळा
लाखो भक्तांची उपस्थिती; रक्तदान, सामूहिक विवाह व महाप्रसादातून सामाजिक संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ढवळपुरी (ता. पारनेर) येथे संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमात कबीर परमेश्वर निर्वाण दिनानिमित्त 27 ते 29 जानेवारी दरम्यान भव्य भंडाऱ्यासह धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यास राज्यासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या लाखो भक्तांनी उपस्थिती लावून संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला होता. सत्संग, भजन-कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद तसेच विविध सामाजिक उपक्रमांमुळे हा कार्यक्रम रंगला होता.
तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात दररोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत संत रामपालजी महाराज यांच्या विचारधारेवर आधारित सत्संग व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. “सर्व धर्म समभाव, मानवता हाच खरा धर्म” हा संदेश सतत अधोरेखित करण्यात आला. भक्तांना अंधश्रद्धा, व्यसनमुक्त जीवन, सत्य व सदाचाराच्या मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. भजन-कीर्तनामुळे संपूर्ण आश्रम परिसरात भक्तिरसाचा दरवळ पसरला होता.
या धार्मिक सोहळ्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अनेक भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजासाठी योगदान दिले. यासोबतच अनेक जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. हुंडा प्रथेचा विरोध, साधेपणा आणि समानतेचा संदेश देणारा हा विवाह सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमादरम्यान संत रामपालजी महाराज यांच्या शिकवणीनुसार निरोगी, निर्व्यसनी जीवनशैली स्वीकारणे, सर्व जाती-धर्मांचा सन्मान राखणे, समाजात समता व बंधुभाव वाढवणे, महिलांचा सन्मान आणि सामाजिक एकोप्याचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध धर्मांचे पवित्र ग्रंथ येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, ज्यातून सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देण्यात आला.
महाप्रसादासाठी लाखो भक्तांनी शिस्तबद्ध रांगा लावल्या होत्या. आश्रमातील स्वयंसेवकांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे एवढ्या मोठ्या संख्येतील भक्तांची उपस्थिती असूनही सर्व कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडले. सुरक्षा, स्वच्छता, पाणीपुरवठा व वैद्यकीय सुविधांची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. ढवळपुरी परिसरात या तीन दिवसांत जणू भक्तिसागर उसळला होता. धार्मिक, सामाजिक आणि मानवतावादी विचारांचा संगम असलेला हा सोहळा समाजाला सकारात्मक दिशा देणारा व प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थित भक्तांनी व्यक्त केली.
