शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
अधिवेशनाला हजारो संस्थाचालक उपस्थित राहणार -डॉ. संजयराव तायडे पाटील
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यामध्ये इंग्रजी शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांची एकमेव संघटना असलेल्या महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे (मेस्टा) 11 वे राज्यस्तरीय अधिवेशन आत्मा मालिक ध्यानपिठ संस्था, कोकमठाण, शिर्डी- कोपरगाव रोड जि. अहिल्यानगर येथे 31 जानेवारी रोजी होणार आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजयराव तायडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनाचे उद्घाटक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दादाजी भुसे हे राहणार असून, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील हे असणार आहेत. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उत्तर महाराष्ट्र शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे, भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अनिल गावंडे तसेच राज्यातील संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ.नामदेवराव दळवी, राज्य कार्यकारणी प्रमुख विनोद कुलकर्णी, अभिजित देशमुख, अनिल असलकर, विश्वजित चव्हाण, मनिष हांडे, शिक्षण तज्ञ सचिन जोशी, सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, हजारोंच्या संख्येने शिक्षक व शिक्षण प्रेमी उपस्थित राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने इंग्रजी शाळेचे संस्थाचालक व शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन मेस्टाचे जिल्हाध्यक्ष तानाजी गोंदकर, देविदास गोडसे, शहराध्यक्ष आनंद कटारिया, ज्ञानेश डांगे, सतीश शिंदे, किरण सोनवणे व महिला जिल्हाध्यक्षा सालके यांनी केले आहे.
या अधिवेशनामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याकरिता विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन होणार असून, इंग्रजी शाळांना येणाऱ्या विविध अडचणी संघटनेच्या वतीने मंत्री महोदयांसमोर मांडल्या जाणार आहेत. तसेच विविध प्रश्नांची सोडवणूक या माध्यमातून केली जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचे जीवन गौरव पुरस्कार तसेच उत्कृष्ट संस्था, संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक असे विविध पुरस्कार वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनाला लागून भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाचा जास्तीत-जास्त संस्थाचालक, पालक, शिक्षक व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
