कॅन्सरवर वेळेत उपचार केल्यास आजार पूर्णत: बरा होऊ शकतो -डॉ. श्रीनिवास कुलकर्णी
मुळ नगरचे असलेले डॉ. कुलकर्णी उपचार व मार्गदर्शनासाठी सज्ज
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यात कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागृती, योग्य वेळी तपासणी आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाची नितांत गरज निर्माण झाली आहे. कॅन्सरचे योग्य वेळी निदान व योग्य उपचार झाल्यास हा आजार पूर्णत: बरा होऊ शकतो, असे प्रतिपादन नामवंत कॅन्सर तज्ञ डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले आहे. पुणे येथील अद्यावत आरोग्यसुविधांची सेवा आता अहिल्यानगरमध्ये उपलब्ध होत असून, नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
डॉ. श्रीनिवास कुलकर्णी हे सध्या सह्याद्री हॉस्पिटल, हडपसर (पुणे) येथे पूर्णवेळ कॅन्सर तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. यापुढे ते दर महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी अहिल्यानगर येथील साईदिप सह्याद्री हॉस्पिटल येथे उपस्थित राहून कॅन्सरग्रस्त रुग्णांची तपासणी, उपचार व मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज कमी होणार आहे.
डॉ. कुलकर्णी यांनी धुळे येथून एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केली. त्यानंतर काही काळ त्यांनी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे वैद्यकीय सेवा दिली. पुढे जहांगीर हॉस्पिटल येथून त्यांनी डिएनबी (इंटरनल मेडिसीन) ही पदवी मिळवली. कॅन्सर उपचारातील सखोल ज्ञानासाठी त्यांनी बेंगलोर येथील मणिपाल हॉस्पिटल मधून डिएनबी (मेडिकल ऑन्कोलॉजी) ही विशेष पदवी प्राप्त केली. तेथे काही काळ प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनी पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कार्यास सुरुवात केली.
कॅन्सर विषयावर त्यांची अनेक ठिकाणी व्याख्याने आयोजित करण्यात आली असून, देशासह परदेशातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. कॅन्सर प्रतिबंध, लवकर निदान, उपचार पद्धती आणि रुग्णांचे समुपदेशन या विषयांवर ते सातत्याने जनजागृती करत आहेत.
डॉ. श्रीनिवास कुलकर्णी हे मुळचे नगरचे असून, त्यांचे वडील सुभाषराव कुलकर्णी हे सार्वजनिक बांधकाम विभागातून डेप्युटी इंजिनिअर म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे माजी उपप्राचार्य पी. एल. कुलकर्णी हे त्यांचे सख्खे काका आहेत. आपल्या मातृभूमीतील नागरिकांना दर्जेदार कॅन्सर उपचार मिळावेत, या भावनेतून डॉ. कुलकर्णी नगरकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. अहिल्यानगरमध्येच तज्ज्ञ कॅन्सर उपचार सुविधा उपलब्ध होत असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
