विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावित्री ज्योती महोत्सवाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना सक्षम व्यासपीठ मिळत असून त्यांच्या उपजत कलागुणांना व्यावसायिक स्वरूप देण्याची मोठी संधी निर्माण होत आहे. महिलांनी निर्माण केलेल्या उद्योग-व्यवसायातून इतर अनेक महिलांना रोजगार मिळत असून हेच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाची नांदी आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेविका सौ. शितल जगताप यांनी केले.
गुलमोहर रोड, सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सुरू असलेल्या सावित्री ज्योती महोत्सव अंतर्गत निस्वार्थपणे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सौ. जगताप प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अहिल्यानगर महापालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर बार असोसिएशन, समाजकार्य महाविद्यालय तसेच जिल्हाभरातील स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रशांत साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रथम माजी महापौर भगवान फुलसौंदर, नवनिर्वाचित नगरसेवक ऋग्वेद गंधे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, कवी गोपाळ कांबळे तसेच जयश्री शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ. शितल जगताप म्हणाल्या की, अनेक महिलांकडे कला व कौशल्य असते; मात्र योग्य संधी व मार्गदर्शनाच्या अभावामुळे ते पुढे येत नाही. सावित्री ज्योती महोत्सवासारख्या उपक्रमांमुळे महिलांनी तयार केलेले ब्रँड समाजासमोर येत असून त्यातून रोजगारनिर्मिती होत आहे. निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्यांची दखल घेऊन त्यांना पुरस्कारांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यास त्यांचा उत्साह वाढतो आणि समाजकारणालाही चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात सावित्री ज्योती महोत्सव उद्योजक महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना एक चांगली बाजारपेठ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भगवान फुलसौंदर म्हणाले की, महिला उद्योजकांना भरारी देण्याचे काम या उपक्रमाद्वारे होत आहे. एखादा उपक्रम चालू करणे हे खूप सोपे असते, परंतु हे टिकवणे खूप अवघड असते मागील दहा वर्षापासून हे महोत्सव होत असल्याचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी महानायक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच पाहुण्यांच्या हस्ते सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश शिंदे यांनी केले. आभार अनंत द्रविड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अनिल साळवे, आरती शिंदे, जयेश शिंदे, मीना म्हसे, भाऊसाहेब पादीर, मनीषा शिंदे, ॲड. गायत्री गुंड, दिनेश शिंदे, ॲड. मनिषा भिंगारदिवे, ॲड. तुषार शेंडक, डॉ. र्इसाभार्इ शेख, ॲड. महेश सोनवणे, गौतम कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने यांचा झाला गौरव.
डॉ. सुनिता पोटे (आरोग्य क्षेत्र), महेश कदम (रत्नागिरी), मीनाज शेख (पुणे), अमोल काटे (सामाजिक क्षेत्र, पुणे), सेंट सेव्हिअर्स हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्या ज्योत्स्ना शिंदे, प्रा. डॉ. अश्विनी वठारकर, मुख्याध्यापिका संजीवनी पानगे, अलका मतकर (बालक व महिला विकास), सविता बारस्कर (सांस्कृतिक क्षेत्र).
