लोककलावंत, दिव्यांग व निराधारांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करणार -पै. डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) यांच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निमगाव वाघा (ता. नगर) येथे पार पडलेल्या चौथ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात संस्थापक अध्यक्ष संदीप कुमार बोरकर यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
या प्रसंगी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व राष्ट्रपती पोलीस पदक विजेते रतीलाल चौधर तसेच प्रसिद्ध अभिनेत्री गौरी रत्नपारखी यांच्या हस्ते पै. नाना डोंगरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कवयित्री सरोज आल्हाट, साहित्यिक सुभाष सोनवणे, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे सचिव ॲड. राजेश कावरे, राष्ट्रीय लोककलावंतचे संस्थापक अध्यक्ष संदीपकुमार बोरकर, सरपंच उज्वलाताई कापसे, संदिप रासकर, कवी संमेलनाध्यक्ष आत्माराम शेवाळे, ज्येष्ठ कवी आनंदा साळवे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष संदीप कुमार बोरकर यांनी सांगितले की, लोककलावंतांची समृद्ध संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. पारंपरिक लोककला, लोकसंगीत, लोकनाट्य यांना संरक्षण व प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे. त्याचबरोबर दिव्यांग व निराधार घटकांना आधार देण्यासाठी ही संघटना राज्यभर कार्यरत आहे. पै. नाना डोंगरे हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोककलावंत, दिव्यांग व निराधारांसाठी निस्वार्थपणे काम करत असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी जिल्हा कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, लोककलावंत ही आपल्या ग्रामीण संस्कृतीची खरी ओळख आहेत. त्यांच्या कलेतून समाजजागृती, संस्कार आणि परंपरेचे जतन होते. मात्र बदलत्या काळात लोककलावंत उपेक्षित राहिले आहेत. त्यांना न्याय, सन्मान आणि हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. तसेच “दिव्यांग व निराधार बांधवांना सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यांना हक्काचे लाभ मिळवून देणे आणि गरज पडल्यास त्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून लढा देणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेची मजबूत बांधणी करून लोककलावंत, दिव्यांग व निराधार यांचा एक सशक्त आवाज निर्माण केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडीबद्दल डोंगरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
