नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा सन्मान
पारंपारिक वेशभूषा, स्पर्धा व संस्कृतीच्या सोहळ्या रंगला सोहळा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रयास ग्रुपच्या वतीने मराठी संस्कृतीचा जागर करत पारंपारिक पद्धतीने हळदी-कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या महिला नगरसेविकांचा सन्मान करण्यात आला. संस्कृती, सण-उत्सव आणि महिला सक्षमीकरण यांचा सुरेख संगम कार्यक्रमात पाहायला मिळाला.
सारसनगर येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्या सभामंडपात आयोजित या सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेविका गीतांजली काळे, अनिता शेटिया, मीना चोपडा, सुजाता पडोळे, संगीता गणेश भोसले, मनीषा प्रकाश भागानगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी-कुंकूचा कार्यक्रम रंगला. उपस्थित नगरसेविकांचा सन्मान करून महिलांच्या नेतृत्वाचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास श्रुती मनवेलीकर, गीतांजली भागानगरे, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सचिव हिरा शहापुरे, खजिनदार मेघना मुनोत यांच्यासह वंदना पंडित, ज्योती कानडे, स्वाती गुंदेचा, अनिता काळे, हेमा पडोळे, शुभांगी भोयर, पूर्वा एरंडे, सविता धामट, सविता खरात, सोनी पुरणाळे, दीपा मालू, उज्वला मालू, सरला जाकोटिया, दीपा सोनी, सविता मंत्री, सुजाता औटी, राखी जाधव आदींसह ग्रुपच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पारंपारिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी घेण्यात आलेल्या विविध मनोरंजनात्मक, कौशल्यात्मक व बौद्धिक स्पर्धांचा महिलांनी मनसोक्त आनंद घेतला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयास ग्रुपच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोलताना श्रुती मनवेलीकर म्हणाल्या की, मराठी संस्कृतीचा वारसा महिलांमुळेच जपला जात आहे. अशा कार्यक्रमांतून महिला एकत्र येऊन संस्कार व संस्कृतीचा जागर करीत असून, त्यांच्या माध्यमातून संस्कारी पिढी घडत आहे. केवळ हळदी-कुंकूचा कार्यक्रम न करता महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, प्रयास ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीन विकासावर वर्षभर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित महिला नगरसेविकांनीही महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्धपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना सुरभी ब्युटी पार्लरच्या संचालिका श्रुती मनवेलीकर यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी लड्डा यांनी केले, तर ज्योती कानडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
