सावित्री-ज्योती महोत्सवाचे उद्घाटन
राज्यभरातील महिला बचत गटांच्या उत्पादनांचा समावेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जीभेच्या चवेसाठी स्वयंपाकगृह सजल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्र हे जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री बनत चालली आहे. निरोगी व आनंदी कुटुंबासाठी आरोग्यदायी स्वयंपाकगृह महत्त्वाचा ठरत आहे. या संकल्पनेने आनंदी कुटुंबाची अनुभूती मिळणार असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
अहिल्यानगर महापालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर बार असोसिएशन, समाजकार्य महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित सावित्री ज्योती महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश योगेश पैठणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, जिल्हा विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांच्यासह ॲड. दिनेश शिंदे, अनंत द्रविड, गौतम कुलकर्णी, जयेश शिंदे, ॲड. गायत्री गुंड, ॲड. तुषार शेंडगे, ॲड. अक्षय ठोकळ, विद्या शिंदे, मनीषा भिंगारदिवे, आरती शिंदे, ज्ञानदेव पांडुळे, भाऊसाहेब पादिर, दिपाली उदमले तसेच मोठ्या संख्येने महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.

पुढे बोलताना पद्मश्री पवार म्हणाले की, खेळामुळे शरीर सुदृढ झाले आणि त्याचा उपयोग ग्रामविकास व सामाजिक कार्यात अधिक प्रभावीपणे करता आला. सामाजिक चळवळींना बळ देणे अत्यंत आवश्यक असून, त्यातून समाजाला योग्य दिशा मिळते. महिलांसाठी आयोजित केलेला हा सावित्री ज्योती महोत्सव म्हणजे महिला सक्षमीकरणाची नांदी आहे. पैसा व प्रतिष्ठेपेक्षा जीवनातील आनंद अधिक महत्त्वाचा असून, स्वावलंबी व आनंदी समाज घडवण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण होईल, असे प्रयत्न व्हायला हवेत, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी न्यायाधीश योगेश पैठणकर यांनी सावित्री ज्योती महोत्सवाचे कौतुक करताना सांगितले की, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महिलांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरत आहे. राज्यातील विविध नामांकित व दर्जेदार उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने नगरकरांना मोठा संधी उपलब्ध होत आहे. या महोत्सवातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे अत्यंत सकारात्मक पाऊल आहे. अनेक महिलांनी स्वतःच्या उत्पादनांचा स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण केल्याचा आनंद येथे पाहायला मिळतो. दहा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या महोत्सवाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
महोत्सवाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोपाला पाणी अर्पण करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी बचत गटांच्या वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाला भेट देत त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली.
या चार दिवसीय महोत्सवात अकोले-राजूर येथील हातसडीचे तांदूळ, इंद्रायणी, काळभात, पेढे, गावरान कडधान्य, सोनमाळ, राहुरीचे गावरान तूप, विविध प्रकारचे मसाले, जळगावचे तांब्याचे दिवे, ज्वारी व नाचणी पापड, जामखेडची लाकडी पोळपाट-लाटणे, आवळ्याचे पदार्थ, मेहंदी, मॅग्नेटिक थेरपी, आयुर्वेदिक उत्पादने, आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन, सेंद्रिय गुळाचा बासुंदी चहा, कॉफी-लेमन टी, रांगोळ्या, हस्तनिर्मित दागिने, वुलन प्रॉडक्ट्स, स्किन केअर, खाकर, चटण्या, मुखवास, सर्व प्रकारचे पापड, उन्हाळी पदार्थ, खेळणी, पर्स, वनौषधी, पूजा साहित्य, साड्या, रेडिमेड ब्लाऊज, हर्बल कॉस्मेटिक्स, लहान मुलांचे कपडे, गुळ पावडर, माठातले लोणचे यांसह विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
यावर्षी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड, हिंगोली, नांदेड तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला बचत गट व महिला लघुउद्योगांचा या महोत्सवात मोठा सहभाग आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. दिनेश शिंदे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. सृष्टी उदमले या विद्यार्थिनीने सादर केलेल्या बहारदार नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश शिंदे यांनी केले तर आभार अनंत द्रविड यांनी मानले.
