• Wed. Jan 21st, 2026

आजोबागड डोंगरमाथ्यावर अडकलेल्या 12 गिर्यारोहकांचा सुखरूप बचाव

ByMirror

Jan 18, 2026

भारतीय लष्कर, पोलीस, वनविभाग व प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेचे यश


SOS कॉलला भारतीय लष्कराचा तात्काळ प्रतिसाद

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ठाणे-अहिल्यानगर-नाशिक या तीन जिल्ह्यांच्या सीमाभागातील आजोबागड डोंगरमाथ्यावर गेल्या 24 तासांपासून अडकलेल्या 12 गिर्यारोहकांचा (नऊ पुरुष व तीन महिला) अखेर सुखरूप बचाव करण्यात आला. 17 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या एका तातडीच्या SOS कॉलला भारतीय लष्कराने तत्काळ प्रतिसाद देत ही मोहीम हाती घेतली. अहिल्यानगर येथील लष्करी अधिकाऱ्यांनी वेळ न दवडता स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून समन्वय साधला आणि संयुक्त बचाव कार्याची आखणी करण्यात आली.


आजोबागड परिसर हा अतिशय दुर्गम, दाट जंगल व खडकाळ मार्गांनी वेढलेला असल्याने बचावकार्य आव्हानात्मक ठरले. या मोहिमेत पोलीस, वनविभाग (वन्यजीव), स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अचूक नियोजन, जिद्द आणि अनुभवाच्या बळावर पथकांनी कठीण चढ-उतार पार करत गिर्यारोहकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
गिर्यारोहकांना शोधल्यानंतर त्यांना आवश्‍यक ती प्राथमिक वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यानंतर सर्वांना सुरक्षितपणे खूमशेत गावाच्या पायथ्याशी खाली आणण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही जीवितहानी न होता सर्व 12 गिर्यारोहक सुखरूप असल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्‍वास टाकला.


वेळेवर मिळालेला संदेश, भारतीय लष्कराची तत्परता, विविध शासकीय यंत्रणांमधील उत्कृष्ट समन्वय आणि स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली. जीव वाचवण्यासाठी दाखवलेल्या अटळ सेवाभावामुळे नागरी-लष्करी यंत्रणांचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *