अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने तक्रार; विभागीय स्तरावर पारदर्शक चौकशी करून कारखाना बंद करण्याची मागणी
अन्यथा 26 जानेवारीपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक येथे उपोषणाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील माळकुप येथील एका कारखान्यातून निघणारी ॲसीडयुक्त मळी व दूषित सांडपाणी शासन नियमांचे उल्लंघन करून खुलेआम शेतजमिनीत, माळरानात तसेच वनविभागाच्या क्षेत्रात सोडण्यात येत असल्याचा गंभीर आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. या ॲसीडयुक्त केमिकलमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जमिनीतील पाण्याचे क्षार प्रमाण वाढले आहे. परिणामी शेती नापीक होत चालली असून पिकातील धान्याचे प्रमाण घटत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या दूषित सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर भयानक परिणाम होत आहे. दमा, बी.पी., कॅन्सर यासारख्या दुर्धर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पशुधनालाही विविध आजारांना सामोरे जावे लागत असून काही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आल्याचेही गंभीर वास्तव समोर येत आहे.
या संपूर्ण प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अहिल्यानगर व नाशिक विभागाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र, संबंधित कारखान्याची शासन नियमानुसार प्रत्यक्ष पाहणी न करता नियमबाह्य अहवाल पाठविण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे विभागीय स्तरावर स्वतंत्र समिती गठीत करून संपूर्ण कारखान्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कंपनीच्या मालकीच्या जागेत 30 टक्के वृक्ष लागवड करणे बंधनकारक असतानाही कुठेही वृक्षलागवड करण्यात आलेली नाही. तसेच कारखान्यालगतच्या शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे एकरी नुकसानभरपाईही देण्यात आलेली नाही. अनेक शासन नियमांचे उल्लंघन करूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नोटीस निघाल्यानंतर केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून तपासणी अधिकाऱ्यांची दिशाभूल केली जाते, असेही समितीचे म्हणणे आहे.
कारखान्यातून निघणारे दूषित व ॲसीडयुक्त सांडपाणी ई.पी.टी. यंत्रणेमार्फत प्रक्रिया करून विल्हेवाट लावणे गरजेचे असतानाही जाणिवपूर्वक कोणतीही यंत्रणा कार्यान्वित केली जात नसल्याचा आरोप आहे. तसेच कारखान्याची अनेक वाहने एक्स्पायर असून त्यामार्फत शेतजमिनीत ॲसीडयुक्त पाणी सोडले जात असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. या सर्व बाबींची चौकशी करून संबंधित वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अहिल्यानगर येथे जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी इशारा दिला आहे की, विभागीय स्तरावर पारदर्शक चौकशी करून कारखाना तात्काळ बंद करण्यात यावा, हवेचे, जमिनीचे व नागरिकांच्या आरोग्याचे परीक्षण स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात यावे. अन्यथा दिनांक 26 जानेवारी पासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक विभाग, नाशिक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
