साहित्य, समाजप्रबोधन आणि सेवाभावी उपक्रमांचा समावेश
काव्य, शाहिरीतून ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’चा संदेश; युवकांचे रक्तदान; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर) येथे चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात ज्येष्ठ व नवोदित साहित्यिक, कवी, शाहिर, कथाकथनकार यांच्या विचारांची समृद्ध मैफल रंगली होती. साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संस्कार, एकोप्याचा संदेश देत या संमेलनाने ग्रामीण भागात वैचारिक चळवळीचा जागर करण्यात आला. हे संमेलन मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
संमेलनाचे उद्घाटन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व राष्ट्रपती पोलीस पदक विजेते रतीलाल चौधर आणि अभिनेत्री गौरी रत्नपारखी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रारंभी गावातील शहीद स्मारकाला भेट देत शहीद जवान गोरख जाधव यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी स्वागताध्यक्ष कवयित्री सरोज आल्हाट, संमेलनाध्यक्ष साहित्यिक सुभाष सोनवणे, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे सचिव ॲड. राजेश कावरे, राष्ट्रीय लोककलावंतचे संस्थापक अध्यक्ष संदीपकुमार बोरकर, संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे, सरपंच उज्वलाताई कापसे, कवी संमेलनाध्यक्ष आत्माराम शेवाळे, ज्येष्ठ कवी आनंदा साळवे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, साहेबराव बोडखे, लक्ष्मण चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
संमेलनात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, तर महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिलांचा हळदी-कुंकूचा कार्यक्रम रंगला. महिलांना वाण म्हणून राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित पुस्तके देण्यात आली. काव्य व शाहिरीच्या माध्यमातून ‘मुलगी वाचवामुलगी शिकवा’, सार्वजनिक स्वच्छता, संस्कार व सामाजिक जबाबदारी यावर आधारित काव्य व पोवाड्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
राष्ट्रपती पोलीस पदक विजेते रतीलाल चौधर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सकस साहित्य समाजाची प्रतिमा उंचावते व योग्य दिशा देते. गावातील तंटे गावातच मिटले पाहिजेत. त्यासाठी तंटामुक्ती समिती, महिला दक्षता कमिटी व ग्रामसुरक्षा दलाची निर्मिती आवश्यक आहे. पोलीस दलात काम करताना अनेक गावांना तंटामुक्त करून बक्षिसे मिळवून दिली असून, कौटुंबिक कलह सोडवून अनेकांचे संसार पुन्हा जुळविल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.
साहित्यिक सुभाष सोनवणे म्हणाले की, ग्रामीण साहित्य संमेलनातून गावांना विकासाची दिशा मिळते. राजकारण विचारहीन होत असताना साहित्यिक व विचारवंतांनी समाजासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावणे आवश्यक आहे. अभिनेत्री गौरी रत्नपारखी यांनी ग्रामीण भागात साहित्य संमेलन घेण्याचे धाडस कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मोबाईलच्या युगात साहित्य मागे पडत असताना ग्रामीण भागात साहित्याची खरी गरज आहे. ग्रामीण भागातून लेखक, कवी घडत असून त्यांना तसेच वाचक व प्रेक्षक घडविण्याचीही गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. इंग्रजी शाळांकडे वाढता कल पाहता मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कवयित्री सरोज आल्हाट म्हणाल्या की, दरवर्षी कवितेच्या उत्सवातून सामाजिक चळवळीचे जागरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कविता हा साहित्याचा गाभा असून, ती जीवनाचे विविध पैलू उलगडते व माणसाला नैराश्यातून बाहेर काढते. ॲड. राजेश कावरे यांनी अशा उपक्रमातून साहित्याची धुरा पुढे नेऊन समाजाला संस्कार व दिशा देता येईल, असे मत व्यक्त केले.
दुपारच्या सत्रात काव्यसंमेलन रंगले. यात अहमद शेख, संजय बोरूडे, सारीका नळकांडे, बाळासाहेब मुन्तोडे, रूपचंद शिदोरे, दिलीप कापसे, बाळासाहेब कोठुळे, मनिषा गायकवाड, गिताराम नरवडे, निवृत्ती म. कानवडे आदी कवींनी सहभाग घेतला. कथाकथनकार बाळासाहेब देशमुख यांनी ‘मानवतेचा धर्म’ या विषयावर व्याख्यान दिले, तर शिवशाहीर शिवाजी थिटे यांनी पहाडी आवाजातील पोवाड्यांनी रसिकांची दाद मिळवली. रक्तदान करणाऱ्या युवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुरु असलेल्या साहित्य चळवळीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप रासकर यांनी केले. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, ग्रंथालय विभाग (महाराष्ट्र) संचालक अशोक गाडेकर, न्यू अर्पण ब्लड बँकेच्या डॉ. भाग्यश्री पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त पुढील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला :
सौ. राणी अमोल थोरात, ॲड. ऐश्वर्या काळे, संदिप बापू रासकर, पद्मनाभ प्रभाकर हिंगे, राजेंद्र शंकरराव घोडके, कवी संजय बोरूडे, रेखा कैलास गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण कदम, प्रा. डॉ. सुभाष जगन्नाथ देशमुख, मेजर धनेश्वर पतिंगराव भोस, आशा विठ्ठल कुसेकर, रूपचंद दत्तोवा शिदोरे, विद्या उदय माने, वसंत रंगनाथ बडे, डॉ. सौ. अस्मिता किरण खिस्ती, अरविंद बटुले, प्रकाश सोनवणे, सुमित्रा वाघमारे, ॲड. रामदास सूर्यवंशी, प्रमोद गादिया, नलिनी चंद्रकांत राऊत, अभिजीत माने, दिलीप विश्वनाथ कापसे, अशोक कुंडलिक भालके, अहमद पिरनसाहब शेख.
