शहरात राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन
युवा शक्तीच राष्ट्रविकासाचा कणा -ज्ञानेश्वर खुरंगे (जिल्हा क्रीडा अधिकारी)
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत, जय युवा अकॅडमी, शिवगामीनी मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन, उडान फाउंडेशन व माहेर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन झाले. माळीवाडा येथील श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा दिन म्हणून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, विशेष जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, सेवानिवृत्त प्राचार्य संजय पडोळे, ॲड. गायत्री गुंड, ॲड. अक्षय ठोकळ, महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय कसबे, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, रजनीताई ताठे, ॲड. आरती शिंदे, ॲड. विद्या शिंदे, हेमलता कांबळे, दिपाली उदमले, ॲड. दिनेश शिंदे, ॲड. मनीषा भिंगारदिवे, उज्वला सूर्यवंशी यांच्यासह शालेय शिक्षक, विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले की, “राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमधून आजचा सक्षम, आत्मविश्वासपूर्ण युवक घडणार आहे. युवक ही देशाची खरी ताकद असून त्यांच्याच माध्यमातून राष्ट्राचा विकास साधता येतो. मात्र त्यासाठी युवकांना योग्य दिशा, सकारात्मक विचार आणि शारीरिक-मानसिक सशक्तता आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले, “आजच्या युवकांनी मैदानी खेळांकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. निरोगी जीवनासाठी लहान वयात मैदानावर घाम गाळणे आवश्यक आहे. खेळामुळे केवळ आरोग्यच नव्हे, तर शिस्त, संघभावना, चिकाटी आणि नेतृत्वगुणही विकसित होतात. खेळाच्या माध्यमातूनही उज्ज्वल करिअर घडविता येते. अनेक क्लास वन अधिकारी आणि यशस्वी व्यक्तिमत्त्वे खेळातून पुढे आली आहेत. यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, संयम आणि खेळाची तपश्चर्या आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. गायत्री गुंड म्हणाल्या की, “आजचा युवक केवळ करिअरकडे लक्ष देणारा नसून समाजाबद्दल जागरूक असला पाहिजे. कायद्याची माहिती, संविधानाची जाणीव आणि कर्तव्याची भावना युवकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी युवकांना आत्मविश्वास, निर्भयता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. त्याच विचारांवर चालत युवकांनी स्वतःचे आयुष्य घडविले, तर समाज आणि देश नक्कीच प्रगतीच्या दिशेने जाईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सेवानिवृत्त प्राचार्य संजय पडोळे म्हणाले की, “शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा पास होणे नाही, तर जीवनासाठी आवश्यक असलेले संस्कार, मूल्ये आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार आणि स्वामी विवेकानंदांनी युवकांना दिलेली प्रेरणा आजही मार्गदर्शक ठरते.” युवकांनी अपयशाला घाबरू नये, सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यश नक्की मिळते,” हा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय कसबे यांनी केले. उपस्थित वकील वर्ग व मान्यवर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांसह युवक-युवतींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा कुलकर्णी यांनी केले, तर आभार सुभाष पवार यांनी मानले. या उपक्रमास मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष यांचे मार्गदर्शन लाभले.
