26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणार गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये राबविण्यात आलेल्या वीरगाथा 5.0 या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील माथणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी मधील कु. मंजुश्री सुधीर घोरपडे या विद्यार्थीनीची राष्ट्रीयस्तरावर सुपर 100 विजेत्यांमध्ये निवड झाली आहे.
या विद्यार्थीनीस शाळेतील शिक्षक सुनीलअडसूळ, राहुल व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच भारत सरकारच्या वीरगाथा उपक्रमाच्या संगमनेर डायटच्या नोडल अधिकारी ज्योती निंबाळकर यांनी वेळोवेळी यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन केले होते. या स्पर्धेत देशभरातून 1 कोटी 92 लाख 48 हजार 009 स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला होता. त्यातून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या सुपर शंभर विजेत्या विद्यार्थ्यांचा 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या वतीने भारताचे संरक्षणमंत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय वीरगाथा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
शौर्य पुरस्कार विजेते व प्राचीन भारतीय व योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना तसेच नागरी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. देशातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून उपक्रम सादर करता येतात. या उपक्रमात देशातील सर्वोत्तम 100 स्पर्धकांना भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत राष्ट्रीय स्तरावर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
भारत सरकारच्या वीरगाथा राष्ट्रीय पुरस्कारसाठी या विद्यार्थीनीची निवड झाल्याबद्दल घोरपडे हिचे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, संगमनेर डायटचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर, संगमनेर डायटच्या जिल्हा नोडल अधिकारी ज्योती निंबाळकर, डायटचे सर्व अधिव्याख्याते, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र कापरे, केंद्रप्रमुख संजय धामणे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विक्रम अडसूळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंजाबापू घोरपडे, सरपंच विलासराव घोरपडे, उपसरपंच अशोक कांडेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर घोरपडे, ग्रामस्थ, पालक, या सर्वांनी विशेष अभिनंदन केले आहे.
