संक्रांतनिमित्त महिलांच्या कौशल्यांचा उत्सव; महिलांच्या स्वावलंबनाला चालना देणारा राधेय ग्रुपचा उपक्रम
महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारणे ही समाजासाठी सकारात्मक दिशा -गणेश भोसले
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील जैन स्थानकामध्ये संक्रांत सणाचे औचित्य साधत राधेय ग्रुपच्या वतीने महिलांसाठी ‘आनंद नगरी खरेदी महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या खरेदी महोत्सवामध्ये महिलांनी आपल्या कौशल्याचा प्रत्यय देत विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. तिळगुळापासून वाणाचे साहित्य, घरगुती वस्तू, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, साड्या तसेच विविध प्रकारच्या वस्त्रांचे आकर्षक स्टॉल्स येथे लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला सारसनगर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने भेट देत खरेदीचा मनमुराद आनंद लुटला.
या खरेदी महोत्सवाला माजी उपमहापौर गणेश भोसले, नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संजय चोपडा, सुनिताताई फुलसौंदर यांनी भेट देऊन उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, संस्थापिका अध्यक्षा अलकाताई मुंदडा, खजिनदार मेघना मुनोत, आरती थोरात, सल्लागार विद्या बडवे, ज्योती गांधी, उज्वला बोगावत, उषा सोनी, सविता धामट, लीला अग्रवाल, आशा कापसे, रेखा फिरोदिया यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
या प्रदर्शनाचे आयोजन उज्वला मालू व स्वाती नागोरी यांनी केले होते. या उपक्रमाला परिसरातील नागरिक, महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संक्रांत सणाच्या परंपरेला आधुनिक स्वरूप देत महिलांनी स्वतः तयार केलेल्या टिकल्या, सौंदर्य प्रसाधने, रांगोळी, विविध घरगुती साहित्य तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले होते. संक्रांतीसाठी आवश्यक असलेल्या वाण व घरगुती साहित्याच्या खरेदीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, “अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे महिलांना आपल्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध होते. महिलांचे सक्षमीकरण केवळ शब्दांत नव्हे, तर अशा कृतीशील उपक्रमांतून घडते. महिलांनी एकत्र येऊन आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारणे ही समाजासाठी सकारात्मक दिशा आहे. असे उपक्रम महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यास निश्चितच मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात उज्वला मालू व स्वाती नागोरी यांनी सांगितले की, राधेय ग्रुपच्या वतीने महिलांना स्वतःचे व्यासपीठ मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. संक्रांत हा सण केवळ सण म्हणून न साजरा करता महिलांच्या कलागुणांना चालना देणारा उपक्रम म्हणून साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन स्वतःच्या उत्पादनांची विक्री करावी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हाच या उपक्रमामागील हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याच कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश भागानगरे हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा मालू यांनी केले. या उपक्रमासाठी दिलीप मेहेर व अनिल मेहेर यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या महिलांसाठी सोडतीचे आयोजन करण्यात आले असून, दोन भाग्यवान विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
