• Mon. Jan 12th, 2026

जय हिंद फाउंडेशनने लागवड केलेल्या 201 झाडांचा केला ‘वाढदिवस’ साजरा

ByMirror

Jan 10, 2026

विद्यार्थ्यांच्या संगोपनातून झाडे बहरली


प्रत्येकाने वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करावा -सरपंच श्रीकांत आटकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून चिचोंडी (ता. पाथर्डी) येथील आनंदनगर आनंद तीर्थमधील एमआयटी महाविद्यालय परिसरात मागील वर्षी लागवड करण्यात आलेल्या 201 झाडांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.


गेल्या वर्षी जय हिंद फाउंडेशनच्या पुढाकाराने एमआयटी कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून या झाडांचे वर्षभर नियमित पाणी, संगोपन व काळजीपूर्वक संवर्धन करण्यात आले. परिणामी आज ही झाडे जोमाने वाढून परिसर हिरवागार व मनमोहक बनला असून, या झाडांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला. यावेळी सरपंच श्रीकांत आटकर, मदन पालवे, जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी गर्जे, ॲड. पोपट पालवे, प्रा. प्रेमकुमार पालवे, प्राचार्य बालाजी घुगे, रमेश कामुनी, सतीश मोरकर, अमोल मांडवकर, अक्षय आहेर, शुभम शिंदे, रामेश्‍वर झाडगे, भाऊसाहेब खाडे, मयूर तोडमल, आदिनाथ पालवे, अंबादास आव्हाड, गोरक्षनाथ गिते, सचिन आव्हाड, बंडू मामा आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.


जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे म्हणाले की, महाविद्यालयाच्या माध्यमातून झाडांचे अत्यंत उत्तम प्रकारे संवर्धन करण्यात आले आहे. वर्षभर झाडांना पाणी देऊन वेळोवेळी निगा राखण्यात आली. त्यामुळे आज ही झाडे बहरली असून, झाडांमुळे मनुष्याचे जीवन अधिक सुंदर होते. झाडांमुळे फळे, फुले, औषधे मिळतात तसेच पावसासाठी व पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावणे आणि ती जगवणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.


प्राचार्य बालाजी घुगे यांनी सांगितले की, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या झाडांची जबाबदारीने काळजी घेतली. वृक्षसंवर्धनातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जाणीव निर्माण झाली असून हीच खरी शैक्षणिक संपत्ती आहे.


सरपंच श्रीकांत आटकर यांनी जय हिंद फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, फाउंडेशनने हजारो झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. प्रत्येक नागरिकाने आपला वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला पाहिजे. जय हिंद फाउंडेशनने पर्यावरण चळवळीत आदर्श निर्माण केला असून महाविद्यालय परिसरात लावण्यात आलेल्या झाडांमुळे परिसर सुशोभित होईल तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात फळेही मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *