महिलांची होणार आरोग्य तपासणी
राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्तचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या निमित्ताने तसेच स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या चौथ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात महिलांसाठी विशेष हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासोबतच महिलांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात येणार असून, या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संमेलनाचे संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे आणि युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे यांनी केले आहे.
मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 12 जानेवारी रोजी निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात साहित्य क्षेत्रातील नामवंत लेखक, कवी, साहित्यप्रेमी आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संक्रांत सणाचे औचित्य साधून महिलांसाठी पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत महिलांची आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे. महिलांचे आरोग्य, त्याबाबत जनजागृती आणि मार्गदर्शन हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा उपक्रम युवक कल्याण योजनेच्या विशेष घटकांतर्गत राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य सेवांचा लाभ मिळावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे. हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उज्वला कापसे, मंदा डोंगरे, संगिता आतकर, सोनाली फलके, मंगल ठाणगे, गया आतकर, राणी कदम, कोमल ठाणगे, आशामती काळे, सुवर्णा राऊत आदी महिला परिश्रम घेत आहेत. या उपक्रमासाठी ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे तसेच रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
