• Wed. Dec 31st, 2025

छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार 2025 जाहीर

ByMirror

Dec 10, 2025

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडारच्या वतीने होणार गौरव


99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण.

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारताच्या स्वातंत्र्यासाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी रयतेसाठी ब्रिटिशांविरुद्ध एकाकी झुंज देऊन करवीर संस्थांचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज अहमदनगर येथे हुतात्मा झाले. त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीने छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावे दरवर्षी मानाचे राज्य साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी दिली.


हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या हौतात्म्य (स्मृति) दिनाचे अवचित्य साधून हे पुरस्कार दरवर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदान करण्यात येतात. पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. यावर्षीचे पुरस्कार निवड समितीने परीक्षण करून जाहीर केले आहेत. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने जिल्हाभर शिक्षण प्रसार करून ज्ञानगंगा प्रवाहित केली. संस्थेची विद्यालय व महाविद्यालय ग्रामीण भागात विद्याप्रसार करताना विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तू व गरजा भागविण्यासाठी संस्थेने सहकारी ग्राहक भांडाराची स्थापना केली. अशा या भांडाराची वाटचाल यशस्वीरित्या चालू आहे. या श्री. शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराच्या वतीने संस्थेचे प्रेरणास्थान असलेले हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावे राज्य साहित्य पुरस्कार देण्यात येतात. त्या पुरस्काराचा प्रदान सोहळा गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 8:30 वाजता राजर्षी शाहू महाराज सभागृह न्यू आर्ट्‌स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अ.नगर येथे संपन्न होत आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव व श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराचे सभापती ॲड. विश्‍वासराव आठरे पाटील यांनी दिली. सदर कार्यक्रमास साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथवितरक आणि साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


यावर्षीचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार 2025 पुढील प्रमाणे- सातारा येथील विद्या पोळ- जगताप यांच्या बाय गं ( कादंबरी), बीड येथील दत्ता बारगजे यांच्या फकिरी ( आत्मचरित्र), ठाणे येथील डॉ. संजय दिगंबर जोशी यांच्या कथा जैवविविधतेची (लेख संग्रह), अकोले येथील प्रा. डॉ. रंजना मधुकर कदम यांच्या विचारवेध (वैचारिक), नाशिक येथील किरण भावसार यांच्या घामाचे संदर्भ (कवीता संग्रह), ठाणे येथील विद्या विनायक निकम यांच्या अस्वस्थ मनाचे पडघम (ललित ग्रंथ) या साहित्यकृतींना राज्य साहित्य पुरस्कार देण्यात येत आहे. तसेच अमरावती येथील ॲड. डॉ. नीता प्रफुल्ल कचवे यांच्या छोट्या छोट्या गोष्टी जगण्याची देते दृष्टी (बालसाहित्य) या साहित्यकृतीला विशेष राज्य साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील साहित्य पुरस्कार प्रा. भानुदास रतन बेरड यांच्या गंध मातीचा (ललित ग्रंथ) या ग्रंथास जाहीर केला आहे. असे पुरस्कार निवड समितीच्या वतीने पुरस्कार निवड समितीचे कार्यकारी समन्वयक प्रा. गणेश भगत यांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्काराची घोषणा केली.

यावेळी भांडाराचे सभापती व संस्थेचे सचिव ॲड. विश्‍वासराव आठरे पाटील, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सहसचिव मुकेश (दादा) मुळे, भंडाराचे चेअरमन प्रा. रवींद्र देवढे, व्हा चेअरमन सुरेश घुंगाडे, भांडाराचे पदाधिकारी, संचालक व पुरस्कार निवड समिती सदस्य प्रा. मेधाताई काळे, प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, प्राचार्य डॉ. रामदास टेकाळे, प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, प्रा. शशिकांत शिंदे, व्यवस्थापक, राजेंद्र कर्डिले, पुरस्कार समितीचे कार्यकारी समन्वयक प्रा. गणेश भगत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *